छत्तीसगढच्या जंगलात ८ नक्षली ठार, मृतांमध्ये चार महिलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:33 AM2018-07-20T03:33:57+5:302018-07-20T03:34:09+5:30
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.
रायपूर : छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. त्यात चार महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. राज्याच्या अन्य भागात काल, बुधवारी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली होती.
दंतेवाडा-बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील तिमिनारच्या जंगलामध्ये सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. ती दोन तास सुरू होती. दुसऱ्या बाजूने गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी आतील भागात प्रवेश केला, तेव्हा त्यांना सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.
बुधवारी राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जरिना नावाची महिला नक्षलवादी ठार झाली होती. जरिना ही २00५ सालापासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय होती. तिच्यावर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस लावले होते. (वृत्तसंस्था)
>शस्त्रसाठा जप्त
तिमिनारच्या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे बुधवार रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता. त्या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला. जप्त शस्त्रांमध्ये दोन. ३0३ रायफली, १२ बोरिंग गन तसेच दोन इन्सास रायफलींचाही समावेश आहे.