8 SUV, 6 आलिशान घरं, दीड कोटींचे हार...; इंजिनिअरच्या घरावर छापा, मिळालं भलं मोठं घबाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:39 PM2023-02-23T13:39:22+5:302023-02-23T13:41:17+5:30
ईडीने इंजिनिअर वीरेंद्र राम यांच्या आठ एसयूव्ही आणि नवी दिल्लीत डिफेन्स कॉलनीमधील चार घरांसह सहा घरे सापडून काढली आहेत. ईडीच्या छापेमारीत वीरेंद्र राम यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाली आहे.
झारखंडची राजधानी रांची येथील ग्रामीण विकास विभागाचे अभियंता वीरेंद्र राम यांच्या अनेक ठिकाणांवर मंगळवारपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) छापे टाकत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वीरेंद्र राम आणि आलोक रंजन नामक व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वीरेंद्र राम यांची दिल्ली, रांची आणि जमशेदपूर येथे आलिशान घरे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने इंजिनिअर वीरेंद्र राम यांच्या आठ एसयूव्ही आणि नवी दिल्लीत डिफेन्स कॉलनीमधील चार घरांसह सहा घरे सापडून काढली आहेत. ईडीच्या छापेमारीत वीरेंद्र राम यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाली आहे.
या छाप्यात ईडीला मोठ्या प्रमाणावर सोने आणि हिऱ्याचे दागिणे सापडले आहेत. याची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, जवळपास 50 लाख रुपयांच्या कॅश सह कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भात माहितीही मिळाली आहे. एवढेच नाही, तर वीरेंद्र रामने आपल्या वडिलांच्या नावावर चार कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे आणि त्याचे काही कामही सुरू आहे. याशिवाय वीरेंद्र रामकडे 8 महागड्या कारही आढळून आल्या आहेत.
ईडीने मंगळवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 24 ठिकाणी छापेमारी केली होती. यात इंजिनिअर वीरेंद्र राम यांचाही समावेश आहे. ते आरडब्ल्यूडी विभागात इंजिनिअर इन चीफ या पदावर कार्यरत आहेत. 2019 मध्ये एका छाप्यादरम्यान जमशेदपूरमध्ये वीरेंद्र राम यांच्या काही ठिकाणांवरून 2 कोटी 45 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.