जम्मू-काश्मिरात २४ तासांत ८ अतिरेकी ठार; भारतीय जवानांनी ठोकलं 'शतक'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:32 AM2020-06-20T02:32:53+5:302020-06-20T06:53:20+5:30
दोन चकमकींचे यश : आयईडीचा स्फोट घडविण्याचा कट उधळला गेला; यावर्षी १०० अतिरेकी संपवले
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींत आणखी सहा अतिरेकी मारले गेले. यामुळे मारल्या गेलेल्यांची संख्या आता ८ झाली आहे. शुक्रवारी दोन अतिरेकी पुलवामा चकमकीत आणि चार अतिरेकी शोपियानमधील कारवाईत मारले गेले, असे अधिकारी म्हणाला.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या पॅम्पोर भागातील मीज येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी गुरुवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. त्या भागाला त्यांनी घेरल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात एक अतिरेकी मारला गेला, तर इतर दोन अतिरेकी जवळच्या मशिदीत शिरले. संपूर्ण रात्रभर मशिदीभोवती सुरक्षादलाचे कर्मचारी होते. शुक्रवारी सकाळी सुरक्षादलांनी अतिरेकी बाहेर यावेत म्हणून अश्रुधूर सोडला. मशिदीचे पावित्र्य राखत सुरक्षादलांनी दोन अतिरेक्यांना ठार मारले.
या कारवाईत एकूण तीन अतिरेकी मारले गेले. अतिरेकी मशिदीबाहेर यावेत यासाठी ना गोळीबार केला गेला ना आयईडीचा वापर, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. संयम आणि व्यावसायिकता कामाला आली. गोळीबार किंवा आयईडीचा वापर न करता फक्त अश्रुधुराचा वापर केला. मशिदीचे पावित्र्य राखले गेले. मशिदीत लपलेले दोन्ही अतिरेकी मारले गेले, असे कुमार म्हणाले. शोपियानच्या मुनंद-बंदपावा भागात गुरुवारी सुरू केलेल्या अतिरेकीविरोधी कारवाईत शुक्रवारी सकाळी चार अतिरेकी मारले गेले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. या भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना शोधण्यात आले. २४ तासांत एकूण ८ अतिरेकी दोन चकमकींत मारले गेले. यावर्षी एकूण १०० अतिरेक्यांना सुरक्षादलांनी ठार मारले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला. हे खतरनाक अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तयबाशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)
राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमारा
जम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी कोणतेही कारण नसताना तोफमारा केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे अधिकारी म्हणाला. सकाळी १०.४५ वाजता पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांतून नौशेरा सेक्टरमध्ये (राजौरी जिल्हा) मारा केला.
नियंत्रण रेषेवरील जंगलात आग
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील मानकोटे सेक्टरमध्ये जंगलात लागलेल्या मोठ्या आगीमुळे भूसुरुंगांचे स्फोट झाले, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षादलांनी जमिनीत हे सुरुंग पेरून ठेवलेले होते.
आमच्याकडे अतिरेकी आयईडीने हल्ले करणार असल्याची माहिती आली होती. पाकिस्तानी जैशचा कमांडर अदनान आणि कुलगाममध्ये वाहीद भाई होते. त्यांनी काही घातपात करायच्या आधीच आम्ही त्यांना नष्ट केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.