शौचासाठी गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू
By admin | Published: September 8, 2016 09:52 AM2016-09-08T09:52:05+5:302016-09-08T09:52:05+5:30
भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रामबाग जिल्ह्यात घडली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 8 - भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रामबाग जिल्ह्यात घडली आहे. सोनी कुमारी असं या मुलीचं नाव असून घराबाहेर शौचासाठी गेली असताना तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. गावातील अनेक लोक त्यावेळी कामावर गेले असल्याने शुकशूकाट होता. कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर सोनीने ओरडण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून काही लोक धावत आले आणि तिला वाचवलं.
कुत्र्यांच्या हल्ल्यात सोनीला शरिरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. राज्य सरकारने भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचं तसंच मुलीच्या घरी शौचालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
'पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी परिसरातील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहे. सरकारी नियमांप्रमाणे कुटुंबाला मदत दिली जाईल. घरात शौचालय नसल्याने मुलीला बाहेर जावं लागलं होतं. आम्ही पीडित मुलीच्या घरी शौचालय बांधून देऊ', असं उपविभागीय अधिकारी किरण कुमारी यांनी सांगितलं आहे.
राज्यात एकूण 30 लाख भटकी कुत्री आहेत. याचा अर्थ कुत्र्यांचं प्रमाण एका व्यक्तीमागे दहा इतकं आहे. फक्त एकट्या रांचीमध्ये 40 हजार भटकी कुत्री आहेत अशी माहिती प्राणीमित्र संघटनेने दिली आहे.