भारतात चुकून आलेल्या बालकाला केले पाकच्या सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:21 AM2021-04-04T04:21:53+5:302021-04-04T04:22:13+5:30
बीएसएफने फ्लॅग मीटिंगमध्ये केले सुपूर्द : जवानांना पाहताच लागला होता रडू
अहमदाबाद : आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतात चुकून आलेल्या आठ वर्षीय बालकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी रेंजर्सच्या सुपूर्द केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी राजस्थानच्या बाडमेर सेक्टरमध्ये सोमरार सीमा तपास चौकीजवळ हा बालक भारतीय हद्दीत आला होता. सद्भावनेच्या दृष्टिकोनातून भारताने त्याला पाकिस्तानी रेंजर्ससमवेत झालेल्या फ्लॅग मीटिंगमध्ये सुपूर्द केले.
२ एप्रिल रोजी करीम हा चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतीय हद्दीत आला होता. तो सीमा चौकीजवळ पहाटे पोहोचला होता. भारतीय जवानांनी त्याला पाहिले व परत जाण्यास सांगितले. परंतु वर्दीतील जवानांना पाहून त्याने रडण्यास प्रारंभ केला. त्यानंतर जवानांनी त्याला खाण्या-पिण्यास दिले. यावर त्याने सांगितले की, तो रस्ता चुकला आहे. त्याचे गाव पाकिस्तानमधील सोमरार असून, त्यापासून तीन किलोमीटरवर तो आढळला होता.
बीएसएफ मुख्यालयामधून निर्देश मिळाल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्ससमवेत तत्काळ फ्लॅग मीटिंग घेण्यात आली आणि बालकाला पाकिस्तानच्या सुपूर्द करण्यात आले.