Subramanian Swamy : "आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी अपयशी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 07:25 PM2022-04-19T19:25:24+5:302022-04-19T19:35:28+5:30
BJP Subramanian Swamy And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं.
नवी दिल्ली - भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी (BJP Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला घेरलं. यासोबतच राष्ट्रीय सुरक्षेबाबतही मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सुब्रहमण्यम स्वामी यांनी याआधी देखील अनेकदा पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.
सुब्रहमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच 2016 पासून आर्थिक विकास दर सातत्याने घसरत आहे. राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे. चीनबद्दल काय भूमिका घ्यायची, याची मोदींना कल्पनाच नाही. याबाबत सुधारणा करण्यास वाव आहे, मात्र ती कशी करायची हे त्यांना माहीत आहे का?' असा खोचक सवाल खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
In 8 years in office we see that Modi has failed to achieve targets of economic growth. On the contrary, growth rate has declined annually since 2016. National security has weakened hugely. Modi inexplicably is clueless about China. There is scope to recover but does he know how?
— Subramanian Swamy (@Swamy39) April 19, 2022
महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. "इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी" असं म्हणत सुब्रहमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार निशाणा साधला होता.
"पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. हे करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधीही आहे. या किमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे ही निव्वळ अक्षमता आहे"असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.