बिहारमधील ८० टक्के मतदार पैसे घेऊन मतदान करण्यास राजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2015 12:44 PM2015-10-07T12:44:46+5:302015-10-07T12:44:46+5:30
बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणुक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ७ - बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणुक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानंतर बिहारच्या निवडणूक आयोगाने आमीषाला बळी न पडता मतदान करावे यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहार निवडणूक आयोगाने जनतेमधील मतदानाविषयीचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी पाटण्यातील चंद्रगुप्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने सर्वेक्षण केले आहे. जून - जुलै २०१५ याकालावधीत सुमारे ४,५०० जणांची मतं या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. यामध्ये ८० टक्के लोकांनी मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात गैर नसल्याचे सांगितले. निवडणूक आयोगानेही या सर्वेक्षणाची दखल घेतली मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. रेडिओ, वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमीषाला बळी न पडता मतदान करा असे आवाहन केले जात आहे. २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत ५२.६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. तर लोकसभा निवडणुकीत हे प्रमाण ५६.२८ टक्क्यांवर पोहोचले होते. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत मतदार राज्याबाहेर असल्याने मतदानाचे प्रमाण कमी होते. याशिवाय मतदान केंद्रावरील लांबच लांब रागांमुळेही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. यंदा मतदानादरम्यान दिवाळीची सुट्टी असल्याने मतदार गावी परततील आणि मतदानाचे प्रमाण वाढेल अशी आशा वर्तवली जात आहे.