पाकिस्तानी तुरुंगातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका, ३ वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 10:32 PM2023-11-12T22:32:52+5:302023-11-12T22:33:16+5:30
Indian Fisharmen: पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.
पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बडोद्यातून या मच्छिमारांना दिवाळीदिवसी आपल्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी बसमधून गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावल येथे नेण्यात आले.
या मच्छिमारांची पाकिस्तानकडून गुरुवारी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पंजाबमधील अटारी-वाघा सरहद्दीवर गुजरातच्या मत्स्यपालन विभागाच्या एका टीमकडे सोपवण्यात आले होते. २०२० मध्ये हे मच्छिमार मासे पडकण्यासाठी गेले असताना ते भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तिथे पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले होते.
सुटका करण्यात आलेल्या ८० मच्छिमारांमधील ५९ मच्छिमार गिर सोमनाथ जिल्हातील, १५ देवभूमी द्वारका येथील, २ जामनगर आणि एक अमरेली येथील आहेत. तर तीन मच्छिमार हे दीव येथील आहेत.
दरम्यान, अजून २०० मच्छिमार हे पाकिस्तानमधील विविध तुरुंगामध्ये कैदेत आहेत. सुटका झालेल्या मच्छिमारांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता येणार आहे. दरम्यान, यावर्षी मे आणि जून महिन्यामध्ये पाकिस्तानच्या सरकारने सुमारे ४०० भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.