बांगलादेशला जाणारे कांद्याचे राेजचे ८० ट्रक जागेवर थांबले, विमाने रद्द, सीमेजवळ जाणे टाळण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:37 AM2024-08-07T11:37:18+5:302024-08-07T11:40:07+5:30

बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार

80 trucks of Rage of onions going to Bangladesh stopped at the spot, canceled flights, appeal to avoid going near the border | बांगलादेशला जाणारे कांद्याचे राेजचे ८० ट्रक जागेवर थांबले, विमाने रद्द, सीमेजवळ जाणे टाळण्याचे आवाहन

बांगलादेशला जाणारे कांद्याचे राेजचे ८० ट्रक जागेवर थांबले, विमाने रद्द, सीमेजवळ जाणे टाळण्याचे आवाहन

अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या असून, बांगलादेशमध्ये भारताकडून हाेत असलेली शेतमालाची आयातही थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. 

नाशिकमधून दररोज ६० ते ७० ट्रक कांदा दरराेज बांगलादेशला ट्रकद्वारे रवाना हाेतो. एका ट्रकमध्ये तीस टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची आफत ओढवू शकते.  नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष अन् कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते.

बिहारमध्ये अलर्ट जारी
बिहारच्या अनेक भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दलांसह पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची सीमा नेपाळशी आहे, ज्याचा वापर इतर देशांतील घुसखोर भारतात प्रवेश करण्यासाठी करतात, असे पोलिसांनी सांगितले.

सीमेजवळ जाणे टाळा...
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बांगला देशातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना सीमावर्ती भागात, विशेषत: रात्रीच्या वेळी अनावश्यक जाऊ नका, असे आवाहन केले आहे.

विमाने रद्द
एअर इंडिया, इंडिगोसह भारतातील काही प्रमुख कंपन्यांनी बांगलादेशासाठीची विमानसेवा तातडीने स्थगित केली आहे. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असून, विमानसेवा स्थगित केल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.

भारताच्या वस्त्रोद्योगावर परिणाम
बांगलादेशातील राजकीय संकट भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी चिंतेचा विषय झाला आहे. येथील कोणत्याही पुरवठ्यात व्यत्यय आल्यास त्याचा पुरवठा साखळीवर तत्काळ परिणाम होईल, त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होईल, असे भारतीय कापड उद्योग परिसंघाने (सिटी) म्हटले आहे.
 

Web Title: 80 trucks of Rage of onions going to Bangladesh stopped at the spot, canceled flights, appeal to avoid going near the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.