'80 व्या वर्षी नोकरी मागतायत', अरुण जेटलींच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:04 AM2017-09-29T11:04:32+5:302017-09-29T11:07:58+5:30

यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज त्या ठिकाणी नसते, जिथे ते आहेत असं म्हटलं आहे

'80 year old job seeking', Arun Jaitley's Khokek Tikheela Yashwant Singh's reply | '80 व्या वर्षी नोकरी मागतायत', अरुण जेटलींच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हांचं प्रत्युत्तर

'80 व्या वर्षी नोकरी मागतायत', अरुण जेटलींच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हांचं प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देअरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केलीअरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असं यशवंत सिन्हा बोललेत'समस्या समजून घेण्यापेक्षा सरकार आपली पाठ थोपटत स्वत:ची स्तुती करण्यात व्यस्त आहेत हीच खरी समस्या आहे'

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केलीये. यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असं म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याला अरुण जेटली जबाबदार आहेत असं यशवंत सिन्हा बोलले होते. उत्तर देताना अरुण जेटली बोलले होते की, 'यशवंत सिन्हा 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत. मी अद्याप तरी अशा स्थितीत नाही की माजी अर्थमंत्री म्हणून वृत्तपत्रात लेख लिहीन'.

अरुण जेटली यांच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हा यांनी उत्तर दिलं आहे. 'सरकार परिस्थिती समजून घेण्यामध्ये पुर्णपणे अयशस्वी ठरली आहे. समस्या समजून घेण्यापेक्षा आपली पाठ थोपटत स्वत:ची स्तुती करण्यात ते व्यस्त आहेत हीच खरी समस्या आहे', असं यशवंत सिन्हा बोलले आहेत. यशवंत सिन्हा यांनी आपला मुलगा जयंत सिन्हा याला आपल्याविरोधात मैदानात उतरवल्यावरुन सरकारवर टीका करत हे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 

इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या बातचीतमध्ये यशवंत सिन्हा यांनी सांगितलं आहे की, 'जे म्हणत आहेत की हा माझा वैयक्तिक हल्ला किंवा टीका आहे, ते चुकीचं आहे. जर अर्थव्यवस्थेशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल तर त्यासाठी अर्थमंत्रीच जबाबदार असणार. यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना जबाबदार धरु शकत नाही. माझा मुलगा जयंत सिन्हाला माझ्याविरोधात उतरवत सरकार मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. मीदेखील वैयक्तिक हल्ले करु शकतो. पण मला त्यांच्या जाळ्यात अडकण्याची इच्छा नाही'. 

काय म्हणाले होते यशवंत सिन्हा ?
अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले.

जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढे असते. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत

अरुण जेटलींनी दिलं होतं उत्तर 
माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सिन्हा यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या सुरात सूर मिळवून सरकारवर हल्लाबोल करणारे दुसरे माजी वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही टोमणे मारले. धोरणांवर बोलण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित टीका करणारे सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत व पूर्वी एकमेकांवर तुटून पडणारे सिन्हा व चिदंबरम आज ते विसरून एका सुरात बोलत आहेत, असा जेटली यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा आशय होता. त्यांच्यासारखा मी अजून तरी ‘माजी’ वित्तमंत्री झालेलो नाही व त्यामुळे मला त्यांच्यासारखे बोलण्याची मोकळीक नाही, असे जेटली म्हणाले.

कोणाचेही नाव न घेता परंतु टोला नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल अशा चतुराईने जेटली म्हणाले,‘ मीही त्यांच्यासारखा माजी वित्तमंत्री असतो तर (संपुआ-2च्या काळातील) ‘धोरण लकवा’ मलाही सोईस्करपणे विसरता आला असता. 1998 ते 2002 दरम्यानची बँकांची 15 टक्के बुडित कर्जे ही माझ्या विस्मृतीत गेली असती. 1991मध्ये वारसा म्हणून मिळालेली चार अब्ज डॉलरची चलन गंगाजळीही माझ्या लक्षात राहिली नसती.’! पूर्वी परस्परांवर तुटून पडणा-यांनी आता सुरात सूर मिळविला म्हणून त्याने वस्तुस्थिती बदलत नाही'.

Web Title: '80 year old job seeking', Arun Jaitley's Khokek Tikheela Yashwant Singh's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.