आश्चर्य : 80 वर्षांच्या सासूबाईंनी सुनेसोबत फक्त 13 दिवसांत जिंकली कोरोनाची लढई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:39 PM2020-04-06T17:39:23+5:302020-04-06T17:54:44+5:30
या दोघींनाही शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, असे असले तरी त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.
गांधीनगर :गुजरातमधील गांधीनगर येथील 75 वर्षांच्या विमलाबेन कानाबार यांच्यानंतर आता एका 80 वर्षांच्या इच्छाबेन पटेल यांनीही कोरोनासोबतची लढाई जिंकली आहे. इच्छाबेन पटेल यांना आपल्या सुनेसह गांधीनगरमधील सिव्हिल रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. या दोघींनी केवळ 13 दिवसांतच कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.
या दोघींनाही शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, असे असले तरी त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. इच्छाबेन पटेल आणि त्यांची सून पीनलबेन यांना दुबईवरून आलेला नातू उमंग पटेल याच्याकडून संसर्ग झाला होता.
10 दिवसांपासून घरी गेले नाही डॉक्टर अरूण -
गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर अरूण मकवाना हे गेल्या 10 दिवसांपासून घरी गेले नाही. ते कोरोना संक्रमितांवर उपचार करत आहेत. ते म्हणाले घरात माझा एक वर्षाहूनही छोटा मुलगा आहे. त्याला संक्रमण होऊनये म्हणून आपणच 10 दिवसांपासून घरी गेलेलो नाही.
येथेच काम करणाऱ्या डॉ. अंजुम जोबान सांगतात, की ड्यूटीवर येताना पती आणि कुटुंबातील इतर सदस्यही हिंमत वाढवतात. मी ते देत असलेल्या धिरामुळेच हे काम व्यवस्थित पणे पार पाडू शकते.
देशातील अनेक भागांतील डॉक्टर आपले कुटुंब दूर ठेऊन कोरोनाविरोधात लढत आहेत. कोरोनाग्रस्तांसाठी तेच सध्या देव बनले आहेत.
पंजाबमधील 81 वर्षांच्या आजीबाईंनीही जींकली कोरोनाची लढाई -
पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील तब्बल 81 वर्षांच्या कुलवंत निर्मल कौर यांनी, संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसला धोबीपछाड दिली आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेंशनबरोबरच पाच स्टेंट्सदेखील आहेत. असे असतानाही त्यांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला. त्या सोमवारी येथील मॅक्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या घरी गेल्या आहेत.