गुडन्यूज.... कोरोनाचे ८२ टक्के रुग्ण झाले बरे, ५९ लाखांवर बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 02:31 AM2020-09-27T02:31:12+5:302020-09-27T02:31:50+5:30
कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ , बळींचा आकडा ९३,३७९
नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. कोरोनाचे ८५,३६२ नवे रुग्ण आढळून आले, तसेच ९३,४२० लोक कोरोनातून बरे झाले असून, अशा व्यक्तींची एकूण संख्या ४८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.
रुग्णांची एकूण संख्या ५९,०३,९३२ झाली आहे. या आजारामुळे आणखी १,०८९ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ९३,३७९ झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या ४८,४९,५८४ झाली असून, हे प्रमाण ८२.१४ टक्के आहे. रुग्णांचा मृत्यूदर १.५८ टक्के आहे. सध्या ९,६०,९६९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, हे प्रमाण १६.२८ टक्के आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर रोजी १३,४१,५३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे चाचण्यांची संख्या ७,०२,६९,९७५ इतकी झाली आहे.
20 लाखांवर कोरोना बळींची संख्या जाणार?
जागतिक स्तरावर कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना टोचली जाण्याच्या आधीच या आजाराच्या बळींची संख्या सध्यापेक्षा दुप्पट म्हणजे २० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
10 लाखांवर कोरोना बळींचा एकूण आकडा
तेलंगणात बार, क्लब पुन्हा सुरू
तेलंगणातील पर्यटन स्थळ परिसरातील बंद ठेवण्यात आलेले बार, क्लब तातडीने पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बार, क्लबच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची अंतिम मुदत १ आॅक्टोबर असून, त्याला आता फक्त पाच दिवस उरले आहेत.
तेलंगणात १४०० बार आहेत. केवळ परवाना शुल्काची मोठी रक्कम गोळा करता यावी याच एकमेव उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असावा अशी टीका काही बारमालकांनी केली आहे. बार, क्लबचे परवाना शुल्क ४१ लाख असून, अर्ज दाखल करण्याचे शुल्क २ लाख रुपये आहे.