देशात 83 लाख कोरोनामुक्त; मृत्यूदर 1.47 टक्क्यांवर !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 01:19 AM2020-11-19T01:19:24+5:302020-11-19T01:20:49+5:30
Corona Virus: कोरोना रुग्णांची संख्या ८९,१२,९०७ असून, बरे झालेल्यांचा आकडा ८३,३५,१०९ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाखांपेक्षा अधिक असून, त्यांचे प्रमाण ९३.५३ टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूण रुग्णसंख्या ८९ लाखांहून जास्त असून, मृत्यूदर अवघा १.४७ टक्के आहे. सलग आठव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी आहे.
कोरोना रुग्णांची संख्या ८९,१२,९०७ असून, बरे झालेल्यांचा आकडा ८३,३५,१०९ आहे. बुधवारी आणखी ३८,६१७ रुग्ण आढळले, तर ४७४ जण कोरोनामुळे मरण पावले. बळींची एकूण संख्या १,३०,९९३ झाली आहे. देशात सध्या ४,४६,८०५ सक्रिय रुग्ण आहेत. जगभरात ५ कोटी ५९ लाख रुग्ण असून, त्यातील ३ कोटी ८९ लाख रुग्ण बरे झाले, तर १३ लाख ४३ हजार लोकांचा मृत्यू झाला.
युरोपात फैलाव मंदावला
फ्रान्स हा युरोपातील असा पहिला देश आहे की जिथे कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांहून अधिक झाली. युरोपात अनेक देशांमध्ये कडक लॉकडाऊन लागू असल्याने कोरोना संसर्गाचा त्या खंडातील फैलाव काही प्रमाणात कमी झाला आहे.