काश्मीर खोऱ्यात अवघे ८.३ टक्के मतदान; लेह-लडाख, राजौरी, जम्मूमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 02:39 AM2018-10-09T02:39:11+5:302018-10-09T02:39:29+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पहिला टप्पा सोमवारी शांततेत पार पडला. काश्मीर खो-यामध्ये अवघे ८.३ टक्के मतदान झाले; मात्र राजौरी, लेह-लडाख, जम्मू भागामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावला.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पहिला टप्पा सोमवारी शांततेत पार पडला. काश्मीर खोºयामध्ये अवघे ८.३ टक्के मतदान झाले; मात्र राजौरी, लेह-लडाख, जम्मू भागामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावला. राजौरी येथे सर्वाधिक ८१ टक्के व कारगिलमध्ये ७८.२ टक्के मतदान झाले. या निवडणुकांवर नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी तसेच फुटीरतावादी संघटनांनी घातलेला बहिष्कार, दहशतवादी हिंसक कारवाया करण्याची शक्यता यांचे सावट होते.
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काश्मीर खोºयातील अनंतनागमध्ये ७.३, बडगाममध्ये १७, बांदीपोरामध्ये ३.४, बारामुल्लात ५.१, कुपवाडात ३२.३, श्रीनगरमध्ये ६.२ मतदान झाले. लेहमध्ये मात्र ५५.२, जम्मूमध्ये ६३.८ आणि पूंछमध्ये ७३.१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. या पहिल्या टप्प्यात ७८ उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले असून त्यापैकी ६९ जण काश्मीर खोºयातील आहेत. मतदानाच्या दिवशी, आज फुटीरतावादी संघटनांनी बंद पुकारल्याने काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. श्रीनगरमधील दुकाने, औद्योगिक आस्थापने, खासगी कार्यालये, पेट्रोल पंप सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहने धावत होती. त्यामुळे लोकही फारसे घराबाहेर पडलेच नाहीत. (वृत्तसंस्था)
भाजपाचा उमेदवार जखमी
जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १५ मधून निवडणूक लढवित असलेले भाजपाचे उमेदवार आदिल अहमद बेहरू हे समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाले. दाचीगाम येथे ते मतदानासाठी जात असताना ही घटना घडली. बांदिपोरा जिल्ह्यात मतदान सुरू असताना काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.