दिल्लीतील हिंसाचारात 86 पोलीस जखमी, आंदोलकांविरुद्ध 15 FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 07:49 AM2021-01-27T07:49:36+5:302021-01-27T08:06:18+5:30
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला.
नवी दिल्ली - कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. मागील दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या शेतकरीआंदोलनांतर्गत प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. यामध्ये दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकरी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसा झाली. त्यानंतर, गृहमंत्रालयाने तात्काळ बैठक बोलावून काही महत्त्वाचे निर्मय घेतले आहेत. राजधानी दिल्लीत अर्धसैनिक दलाच्या तुकड्या हजर होतअसून 1500 जवान तैनात होणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्कर दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव उपस्थित होते. दिल्लीतील संवेदनशील स्थळांवर निमलष्कर दलाचे जवान तैनात केले जातील, असे गृहमंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले. त्यानंतर, लागलीच निमलष्कर दलाच्या सुमारे १५ ते २० कंपन्या म्हणजे १५०० ते २००० जवान दिल्लीत दाखल झाले आहेत. गणराज्यदिनाच्या बंदोबस्तासाठी राजधानीत यापूर्वीच निमलष्कराचे ४५०० जवान तैनात आहेत. आता, लाल किल्ला परिसराला छावणीचं रुप प्राप्त झालं असून निमलष्करीय दलाचे सैनिक शस्त्र घेऊन तैनात आहेत.
Delhi: Heavy security deployment near Red Fort in the national capital.
— ANI (@ANI) January 26, 2021
'83 Police personnel were injured after being attacked by agitating farmers yesterday,' as per Delhi Police. pic.twitter.com/AvK7DVtsEY
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 86 पोलीस जखमी झाले असून 45 पोलिसांना ट्रॉमा सेंटरमध्ये तर 18 पोलिसांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 15 एफआयआर दाखल झाल्या असून 8 बस, 17 गाड्या, 4 कंटेनर आणि 300 पेक्षा जास्त बॅरिकेट्स तोडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांवर आहे.
15 FIRs have been registered in connection with the violence during farmers' tractor rally yesterday. So far, 5 FIRs have been lodged in Eastern Range: Delhi Police Sources
— ANI (@ANI) January 27, 2021
गृहसचिवांनी दिली स्थितीची माहिती
शेतकऱ्यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली परेडशी संबंधित घटनेची माहिती केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांना दिली. ट्रॅक्टर परेडला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला हे विशेष. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी संयमी वृत्तीचा परिचय देत आंदोलनकर्त्यांवर शिताफीने नियंत्रण मिळवले आहे. काहीही झाले तरी आंदोलनकर्त्यांवर गोळीबारासारखे पाऊल उचलायचे नाही, अशी स्पष्ट ताकीद दिली होती. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांवर हल्लेदेखील झाले. आंदोलनकर्त्यांपैकी काहीजण चक्क लाल किल्ल्यावर पोहोचले होते. त्यांनी तेथे शेतकरी युनियन आणि खालसा पंथाचे ध्वज फडकविले, तरीही देशात प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवी सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी गोळीबार न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.
तोडफोडीच्या घटना वगळता फारशी हिंसा नाही
आंदोलनादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला, मात्र तो गोळीबारामुळे नव्हता. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स फेकण्याचे तसेच नांगलोई, आयटीओ आणि इतर तुरळक ठिकाणी झालेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वगळता फारशी हिंसा झालेली नाही. याचे सर्व श्रेय दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाला द्यायला हवे. या यंत्रणांनी परिस्थितीचे भान राखून कमालीच्या संयमाचा परिचय दिला आहे.