लॉकरमध्ये अडकले ८४ वर्षांचे आजोबा, बँक कर्मचाऱ्यांनी चुकून लावले टाळे, १८ तासांनंतर सापडले बेशुद्धावस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:12 PM2022-03-30T13:12:56+5:302022-03-30T13:14:11+5:30
India News: हैदराबादमध्ये एक ८४ वर्षांचे आजोबा बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये कैद झाले. ते सुमारे १८ तास लॉकरमध्येच राहिले. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्यांच्याबाबत तपास केला, तेव्हा त्यांच्याबबत माहिती मिळाली.
हैदराबाद - हैदराबादमध्ये एक ८४ वर्षांचे आजोबा बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये कैद झाले. ते सुमारे १८ तास लॉकरमध्येच राहिले. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्यांच्याबाबत तपास केला, तेव्हा त्यांच्याबबत माहिती मिळाली. तसेच पोलिसांनी जेव्हा बँकेचे लॉकर उघडले तेव्हा हे वृद्ध आजोबा बेशुद्धावस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा प्रकार हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात घडला. येथील रहिवासी असलेले व्ही. कृष्णा रेड्डी हे सोमवारी संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी खासगी कामासाठी बँकेत गेले होते. बँकेत पोहोचल्यावर त्यांनी लॉकर उघडले. त्यादरम्यान, रेड्डी यांना आता बँक बंद होईल याचा विसर पडला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही ते लॉकरमध्ये असल्याचे पाहिले नाही. त्यांनी लॉकरला टाळे लावले आणि बँक बंद करून निघून गेले.
संध्याकाळपर्यंत जेव्हा कृष्णा रेड्डी हे घरी पोहोचले नाहीत तेव्हा कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. काहीच थांगपत्ता लागला नाही तेव्हा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर बँकेचा शोध घेतला. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता जेव्हा बँकेचे लॉकर उघडण्यात आले तेव्हा रेड्डी बँकेतील लादीवर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले.
कुटुंबीयांनी सांगितले की, कृष्णा रेड्डी हे डायबिटीस आणि बीपीचे रुग्ण आहेत. बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.