85 वर्षांच्या आजींची इच्छा, संपूर्ण जमीन करायचीय पंतप्रधान मोदींच्या नावावर; भावूक करणारं आहे कारण
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 3, 2020 04:04 PM2020-12-03T16:04:11+5:302020-12-03T16:07:34+5:30
या 85 वर्षीय आजींचे नाव बिट्टन देवी असून त्या पूरन लाल यांच्या पत्नी आहेत. त्या विकास खंड किशनीतील गाव चितायन येथे राहतात. त्या बुधवारी दुपारी वकील कृष्णप्रताप सिंह यांच्या कडे गेल्या होत्या.
लखनौ -उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात बुधवारी एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. येथे एक आजी आपली संपूर्ण जमीन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्यासाठी थेट तहसील कार्यालयात पोहचल्या. या आजींना आपली संपूर्ण जमीन पंतप्रधान मोदींच्या नावावर करण्याची इच्छा असल्याचे ऐकल्यानंतर वकीलही हैराण झाले. आपली सर्व शेती पंतप्रधान मोदींच्या नावावर करण्यासाठी या आजी आडून बसल्या आहेत. मात्र, यामागचे कारण अत्यंत भावूक करणारे आहे.
या 85 वर्षीय आजींचे नाव बिट्टन देवी असून त्या पूरन लाल यांच्या पत्नी आहेत. त्या विकास खंड किशनीतील गाव चितायन येथे राहतात. त्या बुधवारी दुपारी वकील कृष्णप्रताप सिंह यांच्या कडे गेल्या होत्या. त्यांनी वकिलाला सांगितले, की आपली साडे 12 बीघे जमीन आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करायची इच्छा आहे. बिट्टन देवी यांनी असे म्हणताच वकील हैराण झाले. यानंतर वकील कृष्णप्रताप सिंह यांनी बिट्टन देवी यांना बराच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
यानंतर वकिलांनी त्यांच्यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर बिट्टन देवी म्हणाल्या, त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यांची दोन मुले आणि सुना त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. सरकारकडून मिळत असलेल्या वृद्धावस्था पेन्शनने त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. यामुळे आपल्या नावावर असलेली शेती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्याची त्यांची इच्छा आहे.
यानंतर, वकील कृष्णप्रताप सिंह यांनी आपण उप जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात बोलू, असे सांगून घरी पाठवले आहे. यानंतर, आपण दोन दिवसांनी पुन्हा येऊ असे सांगून आजी परत गेल्या आहेत.