भाजपाच्या खिशात ८६% देणग्या, काँग्रेसच्या वाट्याला केवळ १२ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:15 AM2018-11-07T05:15:41+5:302018-11-07T05:15:56+5:30
विविध कंपन्यांनी देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भाजपच्या वाट्याला आले आहेत.
नवी दिल्ली - विविध कंपन्यांनी देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भाजपच्या वाट्याला आले आहेत. त्यापैकी एका ट्रस्टनेच भाजपला १५४ कोटी, तर काँग्रेसला १0 कोटी दिले आहेत. प्रादेशिक पक्षांपैकी बिजू जनता दलाला काँग्रेसपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत.
या आर्थिक वर्षात ट्रस्टनी राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी एकूण २९०.२२ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. भाजपनंतर बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षाला दोन ट्रस्टकडून १३ कोटी रुपयांचा निवडणूक निधी मिळाला
आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे देणग्या मिळण्याच्या बाबत काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर असून, त्याच्या पदरी फक्त १२ कोटी रुपये आले
आहेत. जनकल्याण ट्रस्टकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५० लाख आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला ४८ लाख रुपयांचा निवडणूक निधी मिळाला
आहे.
पूर्वीचा सत्या निवडणूक ट्रस्ट आता प्रूडंट निवडणूक ट्रस्ट या नावाने ओळखला जातो. या ट्रस्टने मुख्यत्वे भाजप, काँग्रेस, बिजू जनता दल या तीन पक्षांना मिळून १६९.३ कोटी रुपयांच्या निवडणूक देणग्या दिल्या आहेत. त्यात भाजपला १५४.३ कोटी, काँग्रेसला १० कोटी व बिजू जनता दलाला ५ कोटी रुपये मिळाले.
काही ट्रस्टकडून एक पैसाही नाही
निवडणूक आयोगाकडे १५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत जमा असलेल्या माहितीनुसार एबी जनरल निवडणूक ट्रस्टने २०१७-१८ या वित्तीय वर्षात विविध पक्षांना २१.५ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. त्यात भाजपाला १२.५ कोटी, बिजू जनता दलाला ८ कोटी व काँग्रेसला १ कोटी रुपये मिळाले.
ट्रायम्फ निवडणूक ट्रस्टने भाजपा व काँग्रेसला प्रत्येकी एक कोटी रुपये दिले. बाकीच्या निवडणूक ट्रस्टनी आपण एकाही पैशाची देणगी दिलेली नाही, असे जाहीर केले आहे.