6 राज्यांत 86% नवे रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:42 AM2021-03-09T05:42:45+5:302021-03-09T05:43:16+5:30
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू यांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण महाराष्ट्रासहित सहा राज्यांतील आहेत. त्यात केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. सोमवारी कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले असून, ९७ जणांचा बळी गेला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १२ लाखांवर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रामध्ये ११,१४१ नवे रुग्ण आढळून आले. केरळमध्ये २१००, पंजाबमध्ये १,०४३ रुग्ण आढळले. सोमवारी कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख ५७ हजार ८५३ झाली आहे व १ लाख ८८ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यांचे प्रमाण १.६८ टक्के आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाख असून, त्यांचे प्रमाण ९६.९१ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४१ टक्के इतका होता.
राज्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त प्रमाण
महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला वाढणारे नव्या रुग्णांचे प्रमाण ११.१३ टक्के असून ते राष्ट्रीय स्तरावरील २.२२९ टक्के इतक्या सरासरीपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला आहे.
ब्राझिल : १ लाख लोकांवर उपचार
n ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १० लाख झाली आहे व उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या घरात आहे.
n जगामध्ये कोरोनाचे ११ कोटी ७४ लाख रुग्ण आहेत व ९ कोटी २९ लाख लोक बरे झाले. २ कोटी १८ लाख जणांवर उपचार सुरू असून २८ लाख लोकांचा बळी गेला आहे.
n अमेरिकेमध्ये २ कोटी ९६ लाख रुग्ण असून त्यातील २ कोटी ३ लाख रुग्ण बरे झाले तर ५ लाख ३३ हजार जण मरण पावले आहेत.