८.६ टक्केच महिला उमेदवार
By admin | Published: April 10, 2016 02:16 AM2016-04-10T02:16:56+5:302016-04-10T02:16:56+5:30
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय
गुवाहाटी : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. मोठ्या राजकीय पक्षांनी इ.स. २०११ च्या तुलनेत यंदा कमी महिलांना तिकीट दिले आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी फक्त सहा महिला जास्त आहेत. गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी १४ (सर्व काँग्रेस) विजयी झाल्या होत्या. काँग्रेस, भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष आसाम गण परिषद (अगप), बीपीएफ तसेच एआययूडीएफसारख्या सर्व महत्त्वाच्या पक्षांनी महिलांवर विश्वास दाखवलेला नाही. आगपमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. या पक्षाने केवळ दोन महिलांना तिकीट दिले आहे. गेल्यावेळी पक्षाच्या आठ महिला रिंगणात होत्या. भाजपाचा अन्य मित्र पक्ष बीपीएफने २०११ साली तीन महिलांच्या तुलनेत यावेळी फक्त दोघींनाच तिकीट दिले आहे.
७४ जागांवर निवडणूक लढवित असलेला विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष एआययूडीएफने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. माकपा,भाकपा (माले), समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि युनायटेड पीपल्स पार्टीने प्रत्येकी एका महिलेला संधी दिली आहे. तर एसयूसीआयने तीन महिलांना रिंगणात उतरविले आहे. (वृत्तसंस्था)
सत्ताधारी काँग्रेसने आपल्या १२ विद्यमान आमदारांसह १६ महिलांना उमेदवारी दिली आहे. २०११ ला ही संख्या १९ होती. पक्षाच्या दोन आमदारद्वय मंदिरा राय (अलगपूर) आणि अमिया गोगोई (दुलिआजान) यांना वगळण्यात आले असून यावेळी चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात बबिता शर्मा (गुवाहाटी पूर्व), डॉ.जुरी शर्मा बारदोलई (गुवाहाटी पश्चिम), अंगकिता दत्ता (अमगुरी) आणि पल्लवी सैकिया गोगाई (टेओक)यांचा त्यात समावेश आहे. भाजपा ८९ जागांवर निवडणूक लढवित आहे. या पक्षाने यंदा केवळ सहा महिलांना रिंगणात उतरविले आहे. २०११ मध्ये पक्षाने नऊ महिलांना उमेदवारी दिली होती.