८७९ जवानांना ‘हिम समाधी’
By admin | Published: February 7, 2016 01:42 AM2016-02-07T01:42:41+5:302016-02-07T01:42:41+5:30
जम्मू-काश्मीरच्या सियाचीनमध्ये हिमकडे कोसळून एक लष्करी चौकीच बर्फाखाली गेल्याने भारताने पुन्हा आपले १० जांबाज जवान गमावले आहेत. या ७४ किलोमीटर बर्फाच्छादित क्षेत्रावर
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या सियाचीनमध्ये हिमकडे कोसळून एक लष्करी चौकीच बर्फाखाली गेल्याने भारताने पुन्हा आपले १० जांबाज जवान गमावले आहेत. या ७४ किलोमीटर बर्फाच्छादित क्षेत्रावर आपला ताबा कायम ठेवण्याच्या कवायतीत गेल्या तीन दशकांत ८७९ जवान मृत्युमुखी पडले आहेत.
सियाचीन ही जगातील सर्वाधिक धोकादायक युद्धभूमी आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेल्या तीन दशकांपासून या क्षेत्राचा वाद सुरू असून, या ग्लेशिअरवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातर्फे येथे १० हजारांवर जवान तैनात करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सियाचीनमधील लष्कराच्या तैनातीवर दररोज सुमारे सात कोटी रुपये खर्च केला जातो. शिवाय या बर्फाच्छादित क्षेत्रासाठी भारतीय सेनेलाही जवानांच्या रूपात फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. (वृत्तसंस्था)
सियाचीनवर होणारा खर्च
भारतातर्फे आपल्या जवानांच्या सोयीसुविधांसाठी प्रतिदिन येथे सुमारे ६.८ कोटी रुपये खर्च केले जातात. म्हणजेच दर सेकंदाला १८,००० रुपये खर्च होतात.
एवढ्या रकमेत वर्षभरात ४,००० माध्यमिक शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. अथवा ३० वर्षांत १,७२,००० शाळा उभारता आल्या असत्या.
देशात एक चपाती (पोळी) पाच ते दहा रुपयांना मिळते; परंतु सियाचीनला पोहोचेपर्यंत तिची किंमत २०० रुपयांपर्यंत जाते.
१९४९ च्या कराची आणि १९७२ च्या सिमला करारात दोन्ही देश या क्षेत्रात जवान तैनात ठेवणार नाहीत असे ठरले होते. भारत-पाकिस्तानदरम्यान नियंत्रण रेषेच्या उत्तर ध्रुवावर सियाचीन आहे.
एप्रिल १९८४ मध्ये पाकिस्तानद्वारे घुसखोरी आणि कब्जा मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता भारतीय लष्कराने सियाचीन ग्लेशियवर चढाई केली होती. पाकिस्तानने या उंच शिखरावर वास्तव्यायोग्य विशेष जॅकेटस् खरेदीचा करार केल्याचे समजल्यावर भारत सतर्क झाला होता.
जवानांना येणाऱ्या अडचणी
१९८४ पासून आतापर्यंत भारतीय लष्कराच्या ३३ अधिकाऱ्यांसह ८७९ जवानांनी येथे आपले प्राण गमावले आहेत.
यापैकी बहुतांश जवानांचा मृत्यू युद्धात नव्हे तर हिमस्खलनात झाला आहे. येथे आॅक्सिजनचा स्तर फार कमी असल्याने त्यामुळे होणाऱ्या आजारांनी जवान पीडित आहेत.
१८,००० फूट उंचीनंतर मानवी शरीर टिकून राहणे फार अवघड आहे. येथे टूथपेस्टसुद्धा गोठून जाते. व्यवस्थित बोलताही येत नाही.
जवान विशिष्ट प्रकारच्या ‘इग्लू’कपड्यांमध्ये राहतात.
इ.स. २००९ साली झालेल्या एका अध्ययनानुसार सियाचीन ग्लेशियर हळूहळू वितळत असून, निम्म्यावर आला आहे.
हवामानाची स्थिती
हिवाळ्यामध्ये सियाचीनचे तापमान उणे ५० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरते. अशा परिस्थितीत जवानांना येथे आपले पाय रोवणे किती कठीण होत असेल याचा अंदाज येऊ शकतो.
थंडीच्या मोसमात येथे सरासरी १००० सें.मी. बर्फवृष्टी होते. सियाचीनमधील बर्फ वितळून निर्माण होणारे पाणीच लडाखच्या नुब्रा नदीचे मुख्य स्रोत आहे.