भारतात दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:45 AM2021-01-16T05:45:37+5:302021-01-16T05:45:53+5:30
जगातील सर्वांत कमी प्रमाण; ९६.५३ टक्के लोक झाले बरे; देशात २ लाख १३ हजार रुग्णांवर उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांत भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण सापडत असून, हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. या आजारातून एक कोटी एक लाख ६२ हजारांहून अधिक लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९६.५३ टक्के आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी देशात १५,५९० नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०५२७६८३ झाली आहे. त्यातील १०१६२७३८ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी या आजारामुळे आणखी १९१ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या १५१९१८ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २१३०२७ आहे.
जगभरात कोरोनाचे नऊ कोटी ३६ लाख रुग्ण असून, त्यातील सहा कोटी ६९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेमध्ये दोन कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील एक कोटी ४१ लाख जण बरे झाले.
५० वर्षे वयापुढील नागरिकांच्या आकडेवारीसाठी मतदारयाद्यांचा वापर
लसीकरणासाठी प्राधान्य गटात असलेल्या ५० वर्षे वयापुढील नागरिकांची नेमकी संख्या कळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ताज्या लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदार याद्यांतील नोंदी तपासल्या जाणार आहेत. लसीकरणासाठी ५० वर्षे वयापुढील व्यक्तींची मिळवलेली माहिती ही मोहीम संपल्यानंतर केंद्रीय आरोग्य खात्याने त्यांच्या नोंदीमधून काढून टाकावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने सरकारला मदत करावी.
मृत्यूदर कमी असलेल्या देशांमध्ये भारत
भारतामधील कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. गेल्या सात दिवसांमध्ये भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे केवळ एक जण कोरोनामुळे मरण पावला आहे. जगात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.