कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८८ टक्के गर्भवती लक्षणविरहित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 02:55 AM2020-09-28T02:55:10+5:302020-09-28T02:55:42+5:30
अभ्यासातील निरीक्षण; प्रसूतीवेळी इतरांना लागण होण्याचा धोका
मुंबई : कोरोनासंदर्भात गर्भवती महिलांच्या केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना पॉझिटिव्ह ८८ टक्के गर्भवती महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसल्याचे समोर आले आहे. या महिलांच्या कोरोना चाचण्या न केल्यास, त्यांच्यामुळे प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय कर्मचारी, तसेच वॉर्डमधील इतर शिशू, त्यांच्या मातांना कोरोनाचा धोका होऊ शकतो.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ-परळने ‘मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज’सह एक प्रेग कोविड नावाचा नोंदणी विभाग तयार केला आहे. यामध्ये राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, तसेच मुंबईतील नायर रुग्णालयात येणाऱ्या महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यानुसार, राज्यात २५ एप्रिल ते २० मे दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय, तसेच नायर रुग्णालयातील गर्भवती महिलांची माहिती संकलित करण्यात आली. या काळात रुग्णालयात १,१४० महिला दाखल झाल्या होत्या, ज्यात ३२१ महिलांना कोरोना झाला होता. यातील केवळ ३७ महिला म्हणजेच ११.५ टक्के महिलांना कोरोनाची लक्षणे होती, असे प्रमुख अभ्यासक, आयसीएमआर-एनआयआरआरएचचे प्रमुख डॉ. राहुल गजभिये म्हणाले. लक्षणे असणाºया महिलांना ताप, थंडी, जुलाब, श्वास घेण्यास त्रास, वास घेण्याची क्षमता कमी झाच्या तक्रारी होत्या. आयसीएमआरने या सर्व महिलांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. त्यानंतर, निरीक्षणे नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक खबरदारी घेणे गरजेचे
च्आयसीएमआर-एनआयआरआरएचच्या संचालिका डॉ.स्मिता महाले, डॉ.राहुल गजभिये, डॉ.दीपक मोदी, नायर रुग्णालयातील डॉ.नीरज महाजन, तसेच एमईडीडीचे डॉ.राकेश वाघमारे आदींनी या अभ्यासात सहभाग नोंदविला.
च्गर्भवती महिलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्या अतिजोखमीच्या वर्गवारीत येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत त्यांना अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.