२० हजारऐवजी अवघे ८९८ मानसशास्त्रज्ञ! आरोग्य विभागाची आकडेवारी, मानसिक उपचार व्यवस्थेचे विदारक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:41 AM2018-02-11T00:41:51+5:302018-02-11T00:42:00+5:30
संपूर्ण देशाला सध्या एकूण २०,२५० मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. परंतु आज देशाच्या सरकारी आरोग्य विभागाकडे केवळ ८९८ मानसशास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. तसेच सध्या ३७ हजार मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांची गरज असताना देशात केवळ ९०० कार्यकर्ते उपलब्ध आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण देशाला सध्या एकूण २०,२५० मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. परंतु आज देशाच्या सरकारी आरोग्य विभागाकडे केवळ ८९८ मानसशास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. तसेच सध्या ३७ हजार मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांची गरज असताना देशात केवळ ९०० कार्यकर्ते उपलब्ध आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०१५ मध्ये देशाला एकूण १३,५०० मानसशास्त्रज्ञांची गरज असताना त्या घडीला केवळ ३,८२७ उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत त्यांना देशात मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाºया व्यावसायिकांची संख्या कमी असण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, देशाला सध्या ३००० मानसिक उपचार परिचारिकांची गरज असताना केवळ १५०० उपलब्ध आहेत.
सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात
२०११ च्या जनगनणेनुसार देशात ७.२२ लाख लोक मानसिक व्याधींनी ग्रस्त असल्याचे आणि १५ लाखांहून अधिक लोक बौद्धिकदृष्ट्या अक्षम असल्याचे आढळून आले होते.
उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक ७६,६०३ लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त आढळले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ७१,५१५, केरळमध्ये ६६,९१५ तर महाराष्ट्रात ५८,७५३ लोक मानसिक व्याधींनी ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे.