9 मुलांना कारनं चिरडणारा भाजपा नेता नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 09:09 PM2018-02-27T21:09:19+5:302018-02-27T21:09:19+5:30
मुजफ्फरपूर येथे दारूच्या नशेत धुंद होऊन भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडणारा भाजपा नेता देश सोडून पळण्याच्या तयारीत आहे. भाजपा नेता मनोज बैठा हा अपघातानंतर भारत-नेपाळ सीमेजवळ कुठेतरी लपून बसला आहे.
बिहार- मुजफ्फरपूर येथे दारूच्या नशेत धुंद होऊन भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडणारा भाजपा नेता देश सोडून पळण्याच्या तयारीत आहे. भाजपा नेता मनोज बैठा हा अपघातानंतर भारत-नेपाळ सीमेजवळ कुठेतरी लपून बसला आहे. त्याला पकडण्यासाठी शहर पोलीस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तर आरोपी असलेल्या भाजपा नेत्याला 48 तासांच्या आत अटक करण्यात येईल, असंही मुजफ्फरपूरमधले वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे भरधाव वेगाने जाणारी बोलेरो कारने 33 शाळकरी मुलांना चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर बिहारमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातील झपहा येथे घडली होती. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेतून निघण्याची तयारी करत होते. यावेळी एक बोलेरो कार नियंत्रण सुटल्याने थेट शाळेच्या आवारात घुसली. अनपेक्षितपणे भरधाव वेगाने येणा-या बोलेरोखाली 33 विद्यार्थी आले. यामधील गंभीर जखमी झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांना एसकेएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असं म्हटलं आहे.