मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 11:46 AM2023-06-15T11:46:18+5:302023-06-15T11:46:58+5:30
दहा जखमी; लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात
इम्फाळ : मणिपूरमधील खामेनलोक भागातील एका गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार व दहा लोक जखमी झाले आहेत. मैतेई जमातीची बहुसंख्या असलेला इम्फाळ पूर्व जिल्हा व कांगपोकी या आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कुकी जमातीच्या गावाला मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी वेढा दिला. त्यावेळी दहशतवादी व गावकऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. मात्र, या घटनेनंतर इम्फाळ पूर्व व इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी शिथिल करण्याचा कालावधी कमी केला आहे. मणिपूरमधील १६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये मैतेई व कुकी जमातींमध्ये गेल्या महिनाभरातील हिंसाचारात १००हून अधिक लोकांचा मृत्यू व ३१०पेक्षा अधिक जण जखमी झाले. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मैतेई जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी ३ मे रोजी मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर या राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला.
या राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर काही काळ मणिपूरमध्ये शांतता होती; पण आता पुन्हा हिंसक घटना घडल्या. (वृत्तसंस्था)
‘डबल इंजिन’चे सरकार अपयशी का ठरले?
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी का ठरत आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. त्या राज्यातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी एक बैठकही घेतली नाही, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.