संसदेतील कामकाजात ९ खासदार 'खामोश'; शत्रुघ्न सिन्हा अन् सनी देओलचेही मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:59 AM2024-02-13T10:59:34+5:302024-02-13T12:58:14+5:30
संसदेत असेही काही खासदार आहेत, ज्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही सभागृहात भाषण केलं नाही.
नवी दिल्ली - देशाची संसद म्हणजे देशातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हटलं जातं. ६ ते ७ लाख लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन खासदार संसदेत पोहोचतात. आपल्या भागातील, आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडतात. अर्थातच, खासदारांच्या या कामगिराचाही लेखाजोखा ठेवण्यात येतो. मात्र, संसदेतील याच अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, संसदेत असेही काही खासदार आहेत, ज्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही सभागृहात भाषण केलं नाही.
आपल्या दमदार डायलॉगमुळे देशभर आणि पाकिस्तानतही प्रसिद्ध असलेला अभिनेता सनी देओलचाही या न बोलणाऱ्या खासदारांच्या यादीत समावेश आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आला. संसदेतील ५४३ खासदारांपैकी न बोलणाऱ्या खासदारांमध्ये ९ जणांचा समवेश असून माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा हेही 'खामोश'च दिसून आले.
संसदेतील कामकाजावेळी एकही शब्द न बोलणाऱ्या नेत्यांमध्ये प. बंगालचे टीएमसी खासदार दिब्येंदू अधिकारी, कर्नाटकचे भाजपा खासदार व माजी मंत्री अनंत कुमार हेगडे, भाजपा खासदार श्रीनिवास प्रसाद आणि भाजपा खासदार बीएन बचे गौडा यांचा समावेश आहे. तसेच, पंजाबमधून भाजपा खासदार सनी देओल, आसामचे भाजपा खासदार प्रदान बरुआ हेही याच यादीत आहेत.
या खासदारांनी गत ५ वर्षात संसदेतील कुठल्याही चर्चेत सहभाग घेतला नाही. यापैकी काहींनी लिखीत स्वरुपात आपली उपस्थिती दर्शवली आहे. मात्र, शत्रुघ्न सिन्हा हे लिखीत स्वरुपातही ससंदीय कामकाजात सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, वरील खासदारांपैकी तीन खासदार असेही आहेत, ज्यांनी लिखीत किंवा मौखिक अशा कुठल्याही प्रकारात आपला सहभाग नोंदवला नाही. भाजपा सोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झालेल शत्रुघ्न सिन्हा, युपीतून भाजपा खासदार अतुल राय आणि कर्नाटकातून भाजपा खासदार व माजी राज्यमंत्री रमेश सी जिगजिगानी यांचाही समावेश आहे.