यूपीच्या लाचखोर जीएसटी आयुक्तांसह ९ जणांना अटक, लाचलुचपतीचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:28 PM2018-02-03T23:28:54+5:302018-02-03T23:29:03+5:30
वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे कानपूरमधील आयुक्तांना सीबीआयने लाचलुचपत प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच काही दलाल अशा ८ जणांनाही अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे कानपूरमधील आयुक्तांना सीबीआयने लाचलुचपत प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच काही दलाल अशा ८ जणांनाही अटक करण्यात आली आहे.
व्यापारी, उद्योजक व अन्य खासगी व्यक्तींनी कानपूरचे जीएसटी आयुक्त संसार चंद यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. यापूर्वीही त्यांच्याविषयी लाच घेतल्याच्या व मागितल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र यावेळी पुरावे सापडल्याने सीबीआयच्या अधिकाºयांनी लगेच कारवाई केली. संसार चंद हे १९८६ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. ही कारवाई कानपुर व दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये जीएसटी विभागाच्या कार्यालयातील दोन अधीक्षक तसेच संसार चंद यांचा स्वीय सचिव असल्याचे सांगण्यात येते. उरलेले पाचही जण जीएसटी खात्याशी थेट संबंधित नाहीत. मात्र संसार चंद हे त्या पाच जणांमार्फत लाच मागत आणि त्या पाच जणांकडूनच ती स्वीकारली जात असे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाºयांनी दिली.