जम्मू-काश्मीरमध्ये एकाचदिवशी 9 दहशतवादी ठार
By admin | Published: May 27, 2017 08:42 AM2017-05-27T08:42:08+5:302017-05-27T13:17:39+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळया चकमकींमध्ये नऊ दहशतवादी ठार झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - जम्मू-काश्मीरमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळया चकमकींमध्ये नऊ दहशतवादी ठार झाले आहेत. रामपूर सेक्टर आणि त्राल येथे झालेल्या चकमकीत लष्कराने नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हिजबुलचा मुख्य दहशतवादी सबजार अहमदही ठार झाला आहे.
जम्मू काश्मीरमधील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या सहा दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले . भारतीय जवानांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. दरम्यान, या परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. रामपूर सेक्टर हे बारामुल्ला आणि उरी क्षेत्राजवळ आहे.
तर दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये शुक्रवारी (26 मे) रात्री उशीरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला केला होता. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.
त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर सबजार अहमद भट्टचाही खात्मा करण्यात आला आहे. सबजार अहमद भट्ट हा गेल्या वर्षी चकमकीदरम्यान खात्मा करण्यात आलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीचा साथीदार होता. बुरहाननंतर सबजार त्यांच्या दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता.
या परिसरातही लष्काराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील त्रालजवळच्या साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी लगेचच येथील परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांविरोधातील मोहीम दोन दिवसांपूर्वी थांबवण्यात आली होती. येथील हकरीपुरा भागात लष्कर-ए-तोयबाचा काश्मीर प्रमुख अबू दुजाना याच्यासह काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
तर शुक्रवारीच (26 मे) सीमेवर सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. नियंत्रण रेषेवर उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमचा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन बॅट कमांडो ठार झाले.
मे महिन्याच्या सुरुवातील अशाच प्रकारे गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर बॅट कमांडोंनी घात लावून हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता. यापूर्वी याच कमांडोंनी नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांना मारल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली आहे.
भारतीय सैन्याने मंगळवारी दुपारी नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरु आहे. पाकिस्तानातील जनतेसमोर तिथल्या लष्कराची नाचक्की झाल्याने पाकिस्तानकडून अशी कुठली तरी कृती अपेक्षितच होती. पण यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानचा डाव त्यांच्यावर उलटवला.
पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर एक्शन टीमचे (BAT) कमांडो तैनात केले होते. त्यावेळीच अशा प्रकारच्या हल्ल्याची कुणकुण लागली होती. "टाइम्स नाउ" या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीममध्ये केवळ सैन्यचं नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे.
Operation abhi on hai. Militants phanse huye hain aur dono taraf se firing chal rahi hai: Army officer (deferred by unspecified time) pic.twitter.com/Wjz2HipcZa
— ANI (@ANI_news) May 27, 2017
कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगित मिळाल्यामुळे पाकिस्तानचा आधीच तिळपापड झाला आहे. त्यात भारतीय लष्करासमोर हार होत असल्याने पाकिस्तानात सर्वच स्तरावर मोठया प्रमाणावर अस्थिरता आहे. पाकिस्तानी वायू दलाच्या विमानांनी बुधवारी सियाचीनमध्ये भारतीय सीमेजवळून उड्डाण करुन कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तसेच आपणही भारतीय चौक्या कशा नष्ट केल्या त्याचा बनावट व्हिडीओ जारी केला.
J&K: Infiltration bid foiled by Security forces in Rampur sector. Four terrorists killed. Search ops in progress. pic.twitter.com/cYo35I0Eg2
— ANI (@ANI_news) May 27, 2017
नियंत्रण रेषेजवळ संयुक्त राष्ट्रांच्या वाहनावर भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रांनीच फेटाळून लावला आहे. त्यामुळे खोटेपणा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने पत्रकारपरिषद घेऊन भारतीय सैन्याने गोळीबार केल्याच्या बातमीचे खंडन केले. प्रत्यक्षात असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. भीमबेर जिल्ह्यात संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची वाहनेसुद्धा सोबत होती. यावेळी परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. खास संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना लक्ष्य करण्याच्या हेतूने हा गोळीबार झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. कोणीही या गोळीबारात जखमी झालेले नाही असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले.