घरासाठी ९० टक्के पीएफ
By admin | Published: March 16, 2017 12:35 AM2017-03-16T00:35:50+5:302017-03-16T00:35:50+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सदस्य असलेल्या देशभरातील सुमारे चार कोटी नोकरदारांना त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यात जमा असलेली ९० टक्के रक्कम
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सदस्य असलेल्या देशभरातील सुमारे चार कोटी नोकरदारांना त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यात जमा असलेली ९० टक्के रक्कम घर खरेदीसाठी काढता येणार आहे. तसेच घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही प्रॉ. फंडातून भरणे शक्य होणार आहे.
या दोन्ही गोष्टींची तरतूद करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह योजनेत सुधारणा करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार या योजनेत ‘६८ बीडी’ हा नवा परिच्छेद समाविष्ट केला जाईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ही सुधारित तरतूद लागू झाल्यानंतर सदस्यांना निवासी घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी अथवा घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी त्यांच्या प्रॉ. फंड खात्याात जमा असलेल्या रकमेपैकी ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल. मात्र ही सवलत मिळविण्यासाठी रक्कम काढू इच्छिणारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य असायला हवा किंवा ‘पीएफ’चे सदस्य असलेल्या किमान १० जणांनी एकत्र येऊन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केलेली असायला हवी. यात आणखी अशीही तरतूद असेल की, सदस्याने घरासाठी किंवा घराच्या भूखंडासाठी घेतलेल्या कर्जाची शिल्लक रक्कम फेडण्यासाठी किंवा कर्जावरील व्याज भरण्यासाठीही प्रॉव्हिडन्ट फंडातून रक्कम काढता येईल. (वृत्तसंस्था)