धक्कादायक! प्रशिक्षणाविनाच पायलट चालवत होते विमान, ९० वैमानिकांना विमान चालविण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 06:43 AM2022-04-14T06:43:45+5:302022-04-14T06:44:24+5:30
वैमानिकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पाइस जेट विमान कंपनीच्या ९० वैमानिकांना बोइंग ३३७ मॅक्स विमान उडविण्यास मनाई केली आहे.
नवी दिल्ली :
वैमानिकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पाइस जेट विमान कंपनीच्या ९० वैमानिकांना बोइंग ३३७ मॅक्स विमान उडविण्यास मनाई केली आहे. डीजीसीएला वैमानिकांच्या प्रशिक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या वैमानिकांचे प्रशिक्षण नोएडा येथील एका केंद्रात झाले. डीजीसीएने चुकांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डीजीसीएच्या या निर्णयामुळे स्पाइस जेटच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. स्पाइस जेटकडे बोइंग ७३७ मॅक्स विमाने चालविण्यासाठी ६५० पायलट आहेत. यातील यापैकी ९० वैमानिकांवर बंदी घातल्यानंतर अजूनही ५६० वैमानिक त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. स्पाइस जेट सध्या ११ मॅक्स विमाने चालवते. ही ११ विमाने चालवण्यासाठी सुमारे १४४ वैमानिकांची गरज आहे. म्हणजेच त्यात सध्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त पायलट आहेत.
चीनमधील दुर्घटनेनंतर ठेवली पाळत
चीनच्या पर्वतांमध्ये चिनी एअर लाइनचे बोइंग ७३७ विमान कोसळल्यानंतर डीजीसीएने बोइंग ७३७ फ्लाइट ऑपरेशन्सवर पाळत वाढवली आहे. यापूर्वी, इथियोपियन एअरलाइन्स ७३७ मॅक्स विमान आदिस अबाबाजवळ कोसळल्यानंतर डीजीसीएने खबरदारी म्हणून अपघातानंतर तीन दिवसांनी इंडियन एअर लाइन्सच्या मॅक्स विमानांवर बंदी घातली होती.
त्यानंतरच विमान चालवा
- डीजीसीएचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, सध्या वैमानिकांना विमान उडवण्यापासून थांबवले आहे. त्यांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल.
- या चुकांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. स्पाइस जेटने याप्रकरणी म्हटले की, डीजीसीएने ९० वैमानिकांच्या प्रशिक्षणाचे निरीक्षण करीत त्यांना विमान उड्डाण करण्यापासून रोखले आहे.
- पुन्हा प्रशिक्षण दिल्यानंतर वैमानिक विमान उडवू शकतील.