SpiceJet च्या 90 वैमानिकांना 737 मॅक्स विमान उडवण्यास बंदी, DGCA कडून कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:44 PM2022-04-13T12:44:49+5:302022-04-13T12:47:15+5:30
SpiceJet : स्पाइसजेट (SpiceJet) या विमान कंपनीचे वैमानिक योग्य प्रशिक्षण न घेता विमान उडवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नवी दिल्ली : हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या विमान कंपन्यांचा निष्काळजीपणा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) केलेल्या तपासणीत उघड झाला आहे. स्पाइसजेट (SpiceJet) या विमान कंपनीचे वैमानिक योग्य प्रशिक्षण न घेता विमान उडवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
स्पाइसजेटचे 90 वैमानिक पूर्ण प्रशिक्षण न घेता बोईंग 737 मॅक्स विमान उडवत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर या सर्व वैमानिकांवर बंदी घालण्यात आली आहे. आता पूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतरच ते हे विमान उडवू शकतील, असे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले. तसेच, या निष्काळजीपणात सहभागी असलेल्या दोषींवरही डीजीसीए कठोर कारवाई करेल. वैमानिकांनाही प्रशिक्षणासाठी परत पाठवण्यात आले आहे. आता पूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतरच ते कामावर परत येऊ शकतील, असेही ते म्हणाले.
90 pilots have been restrained from flying the Boeing 737 MAX. They will have to undergo training again to the satisfaction of DGCA: DGCA Director-General Arun Kumar to ANI.
— ANI (@ANI) April 13, 2022
स्पाइसजेटचे एकूण 650 वैमानिक
डीजीसीएने या अटीवर हे विमान उड्डाण करण्यास परवानगी दिली होती की, सर्व विमान कंपन्या आपल्या वैमानिकांना संपूर्ण प्रशिक्षणानंतरच त्यांच्या कॉकपिटमध्ये पाठवतील. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, योग्य प्रशिक्षणाअभावी स्पाइसजेटच्या 90 वैमानिकांना विमान उडवण्यापासून रोखण्यात आले आहे. कंपनीकडे एकूण 650 वैमानिक आहेत, जे हे बोइंग विमान उडवतात.
डीजीसीएचे वैमानिकांवर बारकाईने लक्ष
प्रवक्त्याने सांगितले की, डीजीसीए आमच्या सर्व वैमानिकांवर बारकाईने लक्ष ठेवते आणि या प्रक्रियेत 90 वैमानिकांच्या प्रशिक्षणात कमतरता दिसून आली, त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. हे वैमानिक पुन्हा प्रशिक्षण घेतील आणि पूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतर ते विमानाच्या कॉकपिटमध्ये येतील. आमचे उर्वरित 540 पायलट हे विमान उडवण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे आढळले आहे.
या विमानावर भारतात बंदी घालण्यात आली होती
अमेरिकन विमान निर्माता कंपनी बोईंगच्या या विमानावर भारतात बंदी घालण्यात आली होती. मात्र, सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर गेल्या ऑगस्टमध्ये पुन्हा परवानगी देण्यात आली. दरम्यान, 13 मार्च 2019 रोजी या विमानाला भारतात येण्याची परवानगी मिळाली होती आणि त्यानंतर तीन दिवसांनी इथिओपियन एअरलाईन्सचे विमानाचा अपघात झाला. यामध्ये चार भारतीयांसह 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतातील विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली.