उत्तर काश्मीरमध्ये 90 दहशतवादी कार्यरत - मुनीर खान
By admin | Published: May 23, 2017 05:28 PM2017-05-23T17:28:24+5:302017-05-23T17:32:52+5:30
जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात जवळपास 90 दहशतवादी कार्यरत असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी मंगळवारी दिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात जवळपास 90 दहशतवादी कार्यरत असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी मंगळवारी दिली.
आमच्याकडे माहिती आहे की, दहशतवादी काश्मीरच्या उत्तरेकडील भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या भागात अद्याप दहशतवाद्यांची घुसखोरी वाढण्यासंदर्भात कोणताही अहवाल आमच्याकडे नाही, असे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सोपोर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. येथील बारामुल्ला परिसरातून दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा पारंपारिक मार्ग राहिला आहे. मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, या भागात दहशतवाद्यांशी लढण्यास लष्कर समर्थ असून त्याप्रकारे काम सुरु आहे, असेही यावेळी मुनीर खान म्हणाले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरमधील नौगाम नियंत्रण रेषेवरील दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या भीषण चकमकीत लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, यामध्ये लष्कराचे तीन जवानही हुतात्मा झाले. काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. सतर्क सुरक्षा जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळल्यानंतर ही चकमक उडाली होती. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून चार शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त केली होती.
दुसरीकडे, नियंत्रण रेषेवरील कुरापती काढणा-या पाकिस्तानला लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत.
पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणा-या चौक्या लष्कराने तोफगोळयाच्या वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्या. दहशतवादविरोधी रणनितीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरीला मदत करणा-या पोस्टसवर वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई केली जाते अशी माहिती मेजर नरुला यांनी दिली आहे.