९० गाड्यांचा वेग रेल्वेने वाढविला
By admin | Published: October 25, 2015 04:07 AM2015-10-25T04:07:57+5:302015-10-25T04:07:57+5:30
भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११०
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११० मिनिटांची बचत होणार आहे.
भारतातील रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे असली तरीही तिचा वेग फारच कमी आहे. जगभरातील रेल्वेगाड्यांनी गेल्या काही दशकांत आपल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला असला तरीही भारतात मात्र तसा वाढविण्यात आला नाही. भारतीय रेल्वे अजूनही ताशी ५० ते ५२ कि. मी. वेगाने धावते.
या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत प्रथमच ९० गाड्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८९ एक्स्प्रेस आणि सवारी गाड्यांचा वेग प्रतितास पाच कि. मी.ने वाढवून ६० कि.मी. प्रतितास केला जाणार आहे. प्रवासास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेग वाढविण्यात येणारे अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग ताशी १५० कि. मी. आहे. तो आणखी सात कि. मी.ने वाढविण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ८९ गाड्यांचा वेग वाढविण्यात आल्याने १० ते ११० मिनिटांची बचत झाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास पाहता हे खूप मोठे यश आहे. मार्ग कमी व गाड्या जास्त यामुळे खरे तर गाड्यांचा वेग कमी झाला होता. हावड्याहून निघणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेगही केवळ १० कि. मी. प्रतितासाने वाढविला आहे. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. ते पाहता नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आल्याने २५ मिनिटांची, तर नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा वेग वाढविल्याने तब्बल ११० मिनिटांची बचत झाली आहे. मुंबई-अहमदाबाद गाडीचा वेग वाढल्याने २५ मिनिटे कमी लागतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)