900 वर्षे चाललेल्या दुष्काळामुळे सिंधु संस्कृतीचा विनाश- आयआयटी खरगपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 05:42 PM2018-04-16T17:42:03+5:302018-04-16T17:42:03+5:30
ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे.
खरगपूर- जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असणाऱ्या सिंधु संस्कृती लयाला जाण्याची कारणे आजही शोधली जात आहेत. या संस्कृीताचा नाश 900 वर्षे चाललेल्या एका दुष्काळामुळे झाला असे आयआयटी खरगपूरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे. आयआयटी खरगपूरचे हे संशोधन एल्सवियरच्या शोधनियतकालिकामध्ये प्रकाशित होणार आहे.
भूगर्भशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्राच्या तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे 5000 वर्षांपुर्वीच्या या प्रगत संस्कृतीला मान्सूनच्या अनियमिततेची झळ बसली असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सलग 900 वर्षे अत्यंत अपुरा पाऊस पडल्यामुळे सिंधु संस्कृती ज्या नद्यांवर अवलंबून होती त्या नद्यां कोरड्या पडल्या. या दुष्काळाचा परिणाम सिंधु संस्कृतीतील लोक आणि प्राणी नष्ट होण्यावर झाला.
आयआयटी खरगपूरच्या भूगर्भशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि या संशोधनातील मुख्य संशोधक अनिल कुमार गुप्ता यांनी याबद्दल बोलताना सांगितले,'' आम्ही केलेल्या अभ्यासातून ख्रिस्तपूर्व 2350 (4350 वर्षांपुर्वी) ते ख्रिस्तपूर्व 1450 या काळामध्ये मान्सूनने ओढ दिल्याने मोठा दुष्काळ सिंधु संस्कृतीच्या परिसरामध्ये पडला. लोकांना आपली जागा सोडून जावे लागले असे निष्कर्ष निघत आहेत. हे लोक गंगा-यमुना नद्यांच्या खोऱ्याकडे तसेच पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि दक्षिणेस विंध्याचल व दक्षिण गुजरातकडे सरकले असावेत."