बाजारात 9 हजार कोटींचा काळा पैसा, 60 हजार जण रडारवर
By Admin | Published: April 14, 2017 12:53 PM2017-04-14T12:53:33+5:302017-04-14T12:53:33+5:30
आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत. या सर्वांची आयकर विभाग कसून चौकशी करणार आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर बाजारात आलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने ऑपरेशन क्लीन मनी कारवाईला सुरुवात झाली आहे. ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात नोटाबंदीदरम्यान संशयितरित्या आर्थिक व्यवहार करणा-या 18 लाख लोकांना नोटीस पाठवली होती.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यापासून म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत केलेल्या कारवाईत 9 हजार 934 कोटींची अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
एकूण 60 हजार लोकांची ओळख पटली असून यामध्ये 1300 हाय रिस्क लोकांचा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणा-यांवर नजर ठेवण्यात आली होती. महागडी संपत्ती खरेदी करण्याची सहा हजार प्रकरणं समोर आली आहेत. तर परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची तसंच परदेशात पैसे पाठवण्याच्या 6600 प्रकरणांचा अत्यंत बारीकीने तपास केला जात आहे. जर उत्तराने समाधान झालं नाही तर सर्वांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
आयकर विभागाने याचवर्षी 31 जानेवारी रोजी ऑपरेशन क्लीन मनी लाँच केलं होतं. याअंतरग्त 17.92 लाख लोकांना ऑनलाइन नोटीस पाठण्यात आली होती. यामध्ये फक्त 9.46 लाख लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.