सीबीएसई दहावीमध्ये ९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुंबई, गोव्यासह महाराष्ट्राचा समावेश असलेला पुणे विभाग चौथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:49 AM2020-07-16T01:49:07+5:302020-07-16T06:20:17+5:30
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यावर्षी दहावीचे ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९३.३१ टक्के विद्यार्थिनी व ९०.१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत यावेळी ३.१७ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून, बारावीप्रमाणेच याही परीक्षेची टॉपर मेरिट यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मुंबई, गोव्यासह महाराष्ट्राचा समावेश असलेला पुणे विभाग चौथ्या क्रमावर आहे.
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यावर्षी दहावीचे ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९३.३१ टक्के विद्यार्थिनी व ९०.१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत यावेळी ३.१७ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. म्हणजेच यंदाही विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल मागील वर्षीपेक्षा यंदा आणखी सुधारला आहे. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ९० व ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
सीबीएसई दहावी परीक्षेसाठी यंदा १८,८५,८८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८,७३,०१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १७,१३,१२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी ९१.१० टक्के विद्यार्थी पास झाले होते. यंदा देशात विभागवार निकाल पाहता यावेळीही त्रिवेंद्रम विभाग ९९.२८ टक्क्यांसह आघाडीवर आहे. दुसºया क्रमांकावर चेन्नई विभाग (९८.९५ टक्के), तिसºया क्रमांकावर बंगळुरू (९८.२३ टक्के) आहे. पुणे विभाग ९८.०५ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात मुंबई, महाराष्टÑ, गोवा, दीव-दमण, दादर-नगर हवेलीचा समावेश आहे. दिल्ली विभाग ८५.८६ टक्क्यांसह चौदाव्या स्थानावर आहे. कोरोना उद्रेकामुळे सीबीएसईच्या प्रलंबित परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. ईशान्य दिल्लीत दंगलीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या काही परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या.