उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचे ९२ बळी, मंगळवारपर्यंत संततधार सुरूच राहण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:49 AM2019-09-30T04:49:10+5:302019-09-30T04:49:47+5:30
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य हाती घेतले आहे. ही संततधार सोमवारी, मंगळवारीही सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यात पुरात तीन महिला बुडाल्या आहेत. उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानात मुसळधार पावसाने १३ जणांचा बळी घेतला आहे. काश्मिरात एका ५४ वर्षीय उप निरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील पूर्व भागाला मुसळधार पावसाला जोरदार तडाखा बसला आहे. शनिवारी प्रयागराजमध्ये १०२.२ मिमी, तर वाराणसीमध्ये ८४.२ मिमी इतका पाऊस पडला. या भागात यंदा पडलेल्या पावसापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये पावसामुळे शुक्रवारपासून ७९ जण मरण पावले आहेत. लखनऊ, अमेठी, हरदोई व अन्य काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्यांना व पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले
आहेत. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये रुग्णालये जलमय; वैद्यकीय सेवाही कोलमडली
बिहारमध्ये ४८ तासांत मुसळधार पावसाने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये पावसामुळे एक भिंत कोसळून तीन जण ठार झाले. पाटणामध्ये नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह अनेक रुग्णालयांत पावसाचे पाणी शिरले असून, त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
रुग्णालयांतील परिसर जलमय झाल्याने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अॅम्ब्युलन्स नेणे कठीण झाल्याने आजारी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भोजपूर, भागलपूर आदी जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशासनाला दिला आहे. या राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.