दिल्ली मेट्रोतील पाकीटमारांमध्ये ९३ टक्के महिला, सीआयएसएफच्या कारवाईतील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:42 AM2018-01-05T01:42:26+5:302018-01-05T01:42:31+5:30
नवी दिल्ली : राजधानीतील मेट्रो स्टेशन्सवर गेल्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पकडलेल्या पाकीटमारांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या. पाकिटे चोरल्याबद्दल ज्या १,३११ लोकांना पकडण्यात आले, त्यात १,२२२ (९३.३ टक्के) महिला होत्या.
सीआयएसएफने पाकीटचोरांना पकडण्यासाठी पथके तयार केली असली तरी पाकीटमारीत खंड पडलेला नाही. याचे कारण म्हणजे सीआयएसएफला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार नाहीत. आम्ही या चोरांना पोलिसांच्या हवाली करतो. पाकीट गमावलेल्या व्यक्तीने गुन्हा नोंदवला नाही, तर त्या चोराला सोडण्यात येते. मग हेच चोर काही दिवसांनी वेगवेगळ्या मेट्रो स्टेशन्सवर जातात. त्यामुळे एकाच टोळीला अनेक वेळा पकडण्यात आले आहे.
हे पाकीटचोर ज्या स्टेशन्सवर खूपच गर्दी असते अशा ठिकाणी सक्रिय असतात. अशा ठिकाणांत राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, चांदणी चौक, चावडी बाजार, नवी दिल्ली आदींचा समावेश आहे.
पाकीटचोर महिला गटागटांत काम करतात. प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी सोबत लहान मुले बाळगतात.
एक पाकीटचोर प्रवाशाला लक्ष्य करतो त्या वेळी त्याचे इतर सोबती त्याच्या भोवती गोळा होतात किंवा इतर प्रवाशांना तो दिसणार नाही अशा पद्धतीने तेथेच उभे राहतात. या चोरांकडे सापडलेल्या सामग्रीमध्ये लॅपटॉप्स, फोन्स, दागिने, पैशांची पाकिटे, पर्सेस आणि वस्तू होत्या.
महिला, मुलांना मदत
दिल्ली मेट्रो व त्याच्या संकुलांच्या सुरक्षेचे काम सीआयएसएफकडे आहे. सीआयएसएफची पथके प्रवाशांसोबत प्रवास करतात. २०१७ मध्ये १९४१ पुरुष महिलांच्या डब्यात गेल्याबद्दल सीआयएसएफने खाली उतरवले. मेट्रो स्टेशन्सवर अडचणीत सापडलेल्या महिलांना २४८ प्रकरणांत सीआयएसएफने मदत केली व हरवलेली १५३ मुले त्यांच्या पालकांना सुपुर्द केली.
1311 एकूण पाकीटमार
1222महिला
93.3% महिला पाकीटमार