९७ कोटी भारतीयांना परिपूर्ण आहार परवडेना; संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातील धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:11 PM2022-11-02T12:11:10+5:302022-11-02T12:11:27+5:30
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) ही माहिती दिली आहे.
जगातील एकूण उपासमार, कुपोषण, भूकबळी यांची आकडेवारी सतत समोर येत असते. परंतु एकूण लोकसंख्येपैकी किती जणांना आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण आहार मिळतो, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. असा आहार खिशाला परवडणाराही असावा लागतो. नेमके या कारणामुळेच २०२० मध्ये जगात एकूण लोकसंख्येपैकी ४२ टक्के म्हणजे ३०० कोटी लोकांना असा परिपूर्ण आहार पडवडू शकत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) ही माहिती दिली आहे.
परिपूर्ण आहार म्हणजे नेमके काय?
शरीराच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी स्थानिक बाजारात किमान किमतीत उपलब्ध असलेले अन्नपदार्थ आणि प्रत्येक देशाने अन्न सेवनाबाबत निर्धारित केलेली मार्गदर्शक तत्त्वे यांच्या आधारे परिपूर्ण आहाराची किंमत ठरविली जाते. परिपूर्ण आहाराची किंमत दरडोई उत्पन्नापेक्षा ५२ टक्केपेक्षा अधिक असेल त्या व्यक्तीला तो परवडणारा नाही, असे मानले जाते.
जमैकामध्ये आहार सर्वात महाग
परिपूर्ण आहारासाठी प्रतिव्यक्ती प्रतिदिनी येणारा सरासरी खर्च ३.५ डॉलर्स इतका आहे. जमैका या देशात परिपूर्ण आहाराची किंमत सर्वाधिक प्रतिव्यक्ती ६.७ डॉलर इतकी आहे. ही किंमत जागतिक सरासरी किमतीच्या तुलनेत ती ८९% अधिक आहे.