बँकांमध्ये जमा झाल्या 97 टक्के जुन्या नोटा
By admin | Published: January 5, 2017 10:42 AM2017-01-05T10:42:27+5:302017-01-05T10:51:16+5:30
नोटाबंदी निर्णयानंतर 30 डिसेंबरपर्यंत आरबीआयकडे चलनात असलेल्या जुन्या नोटांपैकी 97 टक्के जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - काळा पैसा आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्या. यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याचे आवाहन केल्यानंतर चलनात असलेल्या 15.4 लाख कोटी रुपये असलेल्या जुन्या नोटांपैकी 97 टक्के जुन्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत, अशी माहिती 'बिजनेस स्टँटर्ड'ने दिली आहे. दरम्यान, आरबीआयने अद्यापपर्यंत किती जुन्या नोटा जमा झाल्यात आहेत, याची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
काळा पैसा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली, त्यावेळी 15.44 लाख कोटी रुपये किंमतीच्या जुन्या नोटा चलनात होत्या. नोटाबंदी निर्णयानंतर रद्द केलेल्या नोटा बँकांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवणा-या यंत्रणांचे असे म्हणणे आहे की आतापर्यंत बँकांमध्ये 14.97 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
तर बाजारात एकूण 15.4 लाख कोटी रुपयांच्या जुन्या बाजारात चलनात असल्याचा अंदाज केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. यातील 5 लाख कोटी रुपयांच्या नोटा या काळा पैशांच्या स्वरुपातील असून नोटाबंदी निर्णयानंतर या नोटांचा काही उपयोग होणार नसून त्या पुन्हा चलनात येऊ शकणार नाहीत, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जुन्या नोटा जमा करण्याची अंतिम मुदत 30 मार्चपर्यंत आहे.