2.89 लाख कोटी रुपये जमा करणारे ते 9.72 लाख ठेवीदार रिझर्व्ह बँकेच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 05:49 PM2017-08-31T17:49:43+5:302017-08-31T18:07:16+5:30
नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे.
नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे.
काल बुधवारी रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भारताच्या मध्यवर्ती बँकेने ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी केलेल्या ऐतिहासिक नोटाबंदीनंतर 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर चलनात असलेल्या 99 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आणि अवघे 8000 कोटी रुपये परत आले नसल्याचे सांगण्यात आले.
जवळपास 15 लाख कोटी रुपयांचे चलन परत आल्यानंतर यामध्ये काळ्या पैशाचे प्रमाण लक्षणीय असल्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. अर्थव्यवस्थेतील रोख रक्कमांचे व्यवहार कमी करावे हा नोटाबंदीचा उद्देश होता, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. आता, प्रत्येक पैशाला कुणी ना कुणी मालक असल्याचेही ते म्हणाले.
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना जेटली म्हणाले की, बँकेमध्ये पैसे जमा झाले याचा अर्थ असा नाही, की हे सगळे पैसे कायदेशीर आहेत. नोटाबंदीमुळे तीन लाख नकली कंपन्या उघड झाल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच नोटाबंदीमुळे करदात्यांमध्ये वाढ झाली असून 56 लाख नवीन करदाते यंत्रणेशी जोडले गेले आहेत.
काँग्रेसचा सरकारवर तुफानी हल्ला
रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या आहेत. केवळ १ टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या ६,७00 दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत. बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत. १ हजार रुपयांच्या १.३ टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नाहीत. त्यांची किंमत ८.९ कोटी रुपये आहे.
या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे. १ टक्का रकमेसाठी नोटाबंदी लागू करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यांनी म्हटले की, बंद करण्यात आलेल्या नोटांच्या स्वरूपात १५,४४,000 कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी फक्त १६,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळालेले नाहीत. याचा अर्थ नोटाबंदीतून रिझर्व्ह बँकेला काळ्या पैशाच्या स्वरूपात १६,000 कोटी रुपयांचा लाभ झाला. त्याच वेळी नव्या नोटा छापण्यासाठी २१,000 कोटी रुपये खर्च झाले. ९९ टक्के नोटा कायदेशीररीत्या परत मिळाल्या आहेत.