मृत प्रवाशाच्या बॅगेत ९९ लाख, सोन्याची बिस्किटे
By admin | Published: August 21, 2016 03:35 AM2016-08-21T03:35:11+5:302016-08-21T03:35:11+5:30
(पश्चिम बंगाल) रेल्वेने प्रवास करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत ९९ लाख रुपये आणि सोन्याची तीन बिस्किटे आढळून आल्याने येथील
मिदनापूर : (पश्चिम बंगाल) रेल्वेने प्रवास करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत ९९ लाख रुपये आणि सोन्याची तीन बिस्किटे आढळून आल्याने येथील पोलीस चक्रावून गेले आहेत. एवढी रक्कम त्याच्याकडे कशासाठी होती, याचा शोध त्यांनी सुरू केला आहे.
सुभाषचंद्र सुराणा नावाचा प्रवासी मुंबईहून गीतांजली एक्स्प्रेसने एकटा प्रवास करीत होता. रायपूर ते हावडा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान गाडीने टाटानगर स्टेशन सोडल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. गाडीतील इतर प्रवाशांनी लगेचच पुढील खडगपूर स्टेशनवरील रेल्वे आणि पोलीस अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली.
त्याला खडगपूर स्टेशनवर रेल्वेतून बाहेर काढण्यात आले, पण तो आधीच मरण पावला होता, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तो कुठला आहे, कुठे चालला होता, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याची बॅग उघडली, तेव्हा त्यात ९९ लाख रुपये रोख आणि सोन्याची तीन बिस्किटे सापडली. ती घेऊन तो कुठे निघाला होता, याचा तपास पोलीस घेत आहेत. दरम्यानच्या काळात त्याच्या बॅगेतून आणि खिशातून मिळालेल्या कागदपत्राच्या आधारे त्याची आणि कुटुंबीयांची माहिती पोलिसांना मिळाली. (वृत्तसंस्था)