९९५ कोटी पासवर्डची हॅकर्सने केली चोरी; फोरमवर केले अपलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:49 AM2024-07-07T08:49:45+5:302024-07-07T08:50:00+5:30
एवढ्या प्रचंड संख्येने पासवर्डस्ची चोरी होण्याची ही पहिलीच वेळ
नवी दिल्ली : जगभरातील ९,९४,८५,७५,७३९ युनिक प्लेनटेक्स्ट पासवर्डची चोरी झाली असून एका हॅकरने हे सर्व पासवर्डस एका कुविख्यात हॅकिंग फोरमवर टाकले आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने पासवर्डस्ची चोरी होण्याची ही पहिलीच वेळ असून यासंबंधीचे वृत्त आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
‘सायबरन्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ब्रिचफोरम’ नावाच्या एका हॅकिंग फोरमवर हे सर्व पासवर्ड अपलोड करण्यात आले आहेत. ‘ओबामाकेअर’ या टोपणनावाने वावरणाऱ्या हॅकरने हे पासवर्ड ‘रॉकयू२०२४.टीएक्सटी’ या फाईलनेमने ‘ब्रिचफोरम’वर पोस्ट केले आहेत. या पासवर्ड संकलनात ‘रॉकयू २०२१’ या चोरीच्या क्रेडेन्शिअल डाटाबेसचाही समावेश आहे. या डाटाबेसमध्ये ८.४ अब्ज पासवर्ड्स आहेत.
फोरमवर डाटाची खरेदी-विक्री
‘ब्रिचफोरम’ हे ‘क्रिमिनल अंडरग्राउंड’ फोरम म्हणून जगभरात कुख्यात आहे. या फोरमवर चोरीच्या डाटांची खरेदी-विक्री होते, अशी जाणकारांची माहिती आहे.
दाेन दशकांतीलचोरीचे कारनामे !
प्राप्त माहितीनुसार, हे पासवर्ड्स जगभरात अनेक वर्षांत अनेक वेळा करण्यात आलेल्या हॅकिंगमध्ये चोरण्यात आले आहेत.
ते चोरलेल्या डाटाचे सर्वांत मोठे संकलन ठरले आहे. किमान २ दशकांतील या चोऱ्या असाव्यात असा अंदाज आहे.
१.५ अब्ज नवे पासवर्ड
वृत्तानुसार, या चोरीच्या संकलनात १.५ अब्ज पासवर्ड नवे आहेत. नवे पासवर्ड हे सुमारे ४ हजार डाटाबेसमधून २०२१ ते २०२४ या कालावधीत चोरलेले असावेत, असा अंदाज आहे.