ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास होणार 10 वर्षांची शिक्षा, मोदी सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:34 PM2023-10-27T12:34:42+5:302023-10-27T12:35:20+5:30
कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते.
विवाहित असल्याची माहिती लपवून अथवा आपली खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न करणे अथवा तिच्या सोबत संबंध प्रस्थापित करणे भारतीय न्यायिक संहितेनुसार गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असे करणे छळ मानले जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल.
कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते. यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली अथवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी असे केले, तर तो बलात्कार मानला जाणार नाही, मात्र छळ मानला जाईल.
अशा प्रकरणांत 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतून करण्याची तयारी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, रोजगार देणे, प्रमोशन अथवा लग्नाचे आश्वासन देऊन ओळख लपवून लग्न करणे छळ मानला जाईल, असे या सेक्शनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय न्यायिक संहिता विधेयकावर स्थायी समितीचा मसुदा अहवाल शुक्रवारी सादर केला जाईल.
खरे तर, आपली ओळख लपवून, धर्म लपवून अथवा लग्न लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न केल्याचे आणि नंतर तिचा छळ केल्याचे. अनेक प्रकार गेल्या काही वर्षांत समोर आले आहेत. मात्र आता, ओळख लपवून लग्न करणे, गुन्हा मानून स्वतंत्रपणे खटला चालविला जाईल, असे पहिल्यांदाच होणार आहे.
विशेष म्हणजे, अशा प्रकरणांना कशा प्रकारे सामोरे जायचे, असा पेच पोलिसांसमोर होता. मात्र आता यासंदर्भात कायदा तयार झाल्यानंतर, अशी प्रकरणे कशा पद्धतीने हाताळावीत हेही स्पष्ट होईल.