शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री! शिमल्याच्या १०० वर्ष जुन्या जैन मंदिरात नवा नियम लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 02:01 PM2023-06-18T14:01:19+5:302023-06-18T14:01:58+5:30
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जैन मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही.
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जैन मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही. मंदिर प्राधिकरणाने यासंदर्भात माहिती दिली असून जीन्स पॅंट अथवा शॉर्ट कपडे घातल्यास प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले आहे. शिमल्यातील हे जैन मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे आणि लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. श्री दिगंबर जैन सभा या मंदिराची देखभाल करते. मंदिर प्रशासनाने अलीकडेच नवीन ड्रेस कोडची रूपरेषा देणारी नोटीस मंदिराबाहेर लावली आहे.
मंदिर प्रशासनाने लावलेल्या बोर्डमध्ये म्हटले, "सर्व महिला आणि पुरुषांनी पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालून मंदिरात यावे. शॉर्ट कपडे, हाफ पॅन्ट, बर्मुडा, मिनी स्कर्ट, फाटलेल्या जीन्स, फ्रॉक आणि थ्री क्वार्टर जीन्स इत्यादी परिधान केलेल्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे."
शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री
या प्रकरणावर जैन मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, महिलांची बदलत चाललेली फॅशन आणि पेहरावाची पसंती तसेच हिंदू संस्कृती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर धर्माचे अनुसरण करणारे लोक त्यांच्या मूळ धार्मिक श्रद्धा आणि प्रथा कधीही सोडत नाहीत परंतु हिंदू आणि सनातन धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक मूल्यांशी तडजोड करत आहेत. आम्ही नवीन ड्रेस कोडची रूपरेषा देणारा फलक लावला आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या लोकांनी अनुसरण करण्यास सुरुवात केली आहे.
मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर एका भक्ताने सांगितले की, हे १०० वर्षे जुने मंदिर आहे. हा निर्णय म्हणजे आपल्या संस्कृतीचे पालन करणे होय. छोट्या कपड्यांमध्ये मंदिरांना भेट देणारे या प्रार्थनास्थळांशी संबंधित रूढी आणि परंपरांचे उल्लंघन करत आहेत. तर आणखी एक भक्त हर्ष जैन म्हणाले की, जेव्हा मंदिरांचा विचार केला जातो तेव्हा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारत आहोत आणि आपल्याला आपलाच विसर पडत चालला आहे.