बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:57 PM2024-05-06T17:57:19+5:302024-05-06T17:59:02+5:30
महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिल्याने डॉक्टरही अवाक् झाले.
महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिल्याने डॉक्टरही अवाक् झाले. बिहारमधील किशनगंज येथे हा अनोखा प्रकार घडला. इथे एका महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिला. डॉक्टरांनी याप्रकरणी आश्चर्य व्यक्त केले तर अनेकांनी चमत्कार असल्याची भावना बोलून दाखवली. तर काहीजण यामागील वैज्ञानिक कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तरे साधारणपणे स्त्री एका वेळी एकाच मुलाला जन्म देते. पण, गर्भधारणेच्या वेळेत बदल झाल्यास जुळी मुले जन्माला येतात. पंरतुं एकाच वेळी पाच मुलांचा जन्म ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.
बिहारमधील या दुर्मिळ घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. या आधी एकाच वेळी दोन-तीन मुलांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, किशनगंज येथील या महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नुकतीच आई झालेली महिला जिल्ह्यातील ठाकूरगंज येथील कनकपूर परिसरातील रहिवासी आहे.
एकाचवेळी ५ मुलींना दिला जन्म
माहितीनुसार, ताहेरा बेगम या २७ वर्षीय महिलेला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्यानंतर जवळच्या इस्लामपूर येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. मग इथे तिने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिला. एकामागून एक मुलींचा जन्म होत असल्याचे पाहून डॉक्टर आणि कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. एकाचवेळी पाच मुलींचा जन्म झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने पाचही मुली आणि त्यांची आई पूर्णपणे सुखरूप असून, मुलींच्या जन्मामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, मुलींच्या आईने सांगितले की, जेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर होती तेव्हाच तिला समजले होते की, ती चार मुलांना जन्म देणार आहे. मात्र, मी तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले असता, मी पाच मुलांची आई होणार असल्याचे कळले असे ती सांगते.