2-2 रुपये वसुली करणाऱ्या पोलिसांविरोधात 37 वर्षे चालला खटला, जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:12 PM2023-08-03T19:12:10+5:302023-08-03T19:13:37+5:30
37 वर्षांनंतर वसुली करणाऱ्या पोलीसांची निर्दोष मुक्तता.
पोलिसांनी लाच घेतल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पम, बिहारच्या बेगुसरायमधून एक चकीत करणारे प्रकरण समोर आले आहे. 37 वर्षे जुन्या एका प्रकरणात पाच पोलिसांना व्हिजिलन्स कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. वाहनधारकांकडून दोन-दोन रुपये वसूल केल्याचा आरोप या पोलीस कर्मचार्यांवर होता. युगेश्वर महतो, कैलाश शर्मा, राम बालक राय, रामरतन शर्मा आणि ग्यानी शंकर सिंह अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
हे पोलीस कर्मचारी वसुली करत असतान स्वतः एसपींनी त्यांना पकडले होते. यानंतर बेगुसरायच्या मुफसिल पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तब्बल 37 वर्षांनंतर हा निर्णय आला असून भागलपूरच्या दक्षता न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात फिर्यादी पक्षाकडून कोणताही पुरावा किंवा साक्षीदार सादर करता आले नाही. कोर्टाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
हे प्रकरण 10 जून 1986 चे आहे
हे प्रकरण 10 जून 1986 चे आहे. तत्कालीन एसपी अरविंद वर्मा यांना बेगुसराय येथील लाखो चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली झाल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी शहर परिमंडळ निरीक्षक सरयुग बैठा यांच्यासह लाखो पेट्रोल पंप गाठला. तिथे गेल्यावर काही पोलीस कर्मचारी दोन दोन रुपये वसुली करत असल्याचे निदर्शनास आले.