मध्यरात्री फटाके फोडण्यास विरोध केल्याने वाद, बेदम मारहाण करून ६५ वर्षीय वृद्धाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 06:14 AM2024-11-03T06:14:34+5:302024-11-03T06:18:34+5:30
Faridabad Crime News: फरिदाबादमधील सेक्टर-१८ परिसरामध्ये फटाके फोडण्यावरून झालेल्या वादामधून एका वृद्धाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मृताचं वय ६५ वर्षे असल्याचे समोर आले आहे.
फरिदाबादमधील सेक्टर-१८ परिसरामध्ये फटाके फोडण्यावरून झालेल्या वादामधून एका वृद्धाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मृताचं वय ६५ वर्षे असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत वृद्धाचा मुलगा विनोद राय याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, मी सेक्टर १८ मध्ये माझ्या वडिलांसोबत राहतो. दिवाळीच्या रात्री सुमारे पावणे एक वाजता गोंधळ ऐकून मला जाग आली. तेव्हा शेजारी राहणारे धीरज आणि त्याचे मित्र माझे वडील बच्चन राय यांना मारहाण करत होते. त्यानंतर मी माझ्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
भांडणाचं कारण विचारल्यावर समजलं की, शेजारी राहणारे धीरज आणि त्यांचे मित्र रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर फटाके फोडत होते. त्यामुळे मोठा आवाज येत होता. माझे वडील हे हृदयरोगाचे रुग्ण होते. त्यामुळे त्रास होत असल्याने त्यांनी धीरज आणि त्यांच्या मित्रांना फटाके फोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या धीरज आणि त्याच्या मित्रांनी वडिलांना एकटं पाहून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात बच्चन राय यांना गंभीर जखमा झाल्या. विनोद यांच्या पत्नीने ममता यांनी सांगितले की, आम्ही पोलिसांनाही फोन केला. त्यानंतर पोलिसांच्या तीन गाड्या घटनास्थील दाखल झाल्या. मात्र हद्दीवरून त्यांच्यात आपापसामध्ये वाद झाले. त्यानंतर तासाभराने एक अॅम्ब्युलन्स आली. मग बच्चन राय यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
याबाबत अधिक माहिती देताना फरिदाबाद पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपी धीरज याच्यासह इतकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस लवकर या आरोपींना अटक करतील.