रक्तरंजित फाळणीत ऐक्याचे दर्शन; आज मात्र धार्मिक तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:15 PM2022-02-11T12:15:18+5:302022-02-11T12:16:03+5:30
औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता? असा सवाल त्याने केला होता...
यदू जोशी
मलेरकोटला (पंजाब) : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी संपूर्ण पंजाब रक्ताची होळी खेळत असताना अभूतपूर्व धार्मिक एकोप्याचे दर्शन घडविलेल्या मलेरकोटलामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा बोलबाला दिसत आहे. हिंदू-शीख-मुस्लीम ऐक्याचा इतिहास असलेला हा मतदारसंघ सध्या धार्मिकतेवर विभागल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता? असा सवाल त्याने केला, त्यांना का मारले? मी केला असता त्यांचा सांभाळ अशी भावनिक वाक्ये त्या पत्रात होती.
मलेरकोटलातील ज्येष्ठ पत्रकार सुमंत तलवानी यांच्या मते मुस्तफा यांची भाषा भावना भडकविणारी आहे, ते प्रशासनाला धमकी देताहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोहम्मद रफी यांच्या मते मुस्तफा यांच्यावरील आरोप निराधार आहेत, ते तसे बोललेच नव्हते.
एकीचे दर्शन...
फाळणीचे चटके बसलेली पिढी आजही आहे आणि तिने अनुभवलेल्या वेदना पुढच्या पिढीच्याही अंतर्मनात आहेतच. त्याला अपवाद आहे ते राजधानी चंडीगडपासून ९० किलोमीटरवर असलेले मलेरकोटला. बहुतेक ठिकाणचे मुस्लीम पाकिस्तानात गेले; पण हिंदू-शिखांनी त्यावेळी या ठिकाणच्या मुस्लिमांना पाकिस्तानात जाऊ दिले नाही. उलट त्यांच्यावर कोणी बाहेरून येऊन हल्ला करू नये यासाठी संरक्षक भिंत उभारली. ती मुुस्लिमांच्या एका राजाने शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी यांच्याप्रती दाखविलेल्या श्रद्धेची परतफेड होती.
माजी डीजीपींचे ते विधान अन् पत्नी रझियांची अडचण
या छोटेखानी शहरात निवडणूक धार्मिक वळणावर जाण्यासाठी कारणीभूत ठरले आहे ते पंजाबच्या सामाजिक सुरक्षा तसेच महिला व बालकल्याण मंत्री रझिया सुलताना यांचे पती मोहम्मद मुस्तफा यांचे कथित विधान. मुस्तफा हे राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत. त्यांना चार शौर्यपदके मिळालेली आहेत. रझिया काँग्रेसच्या तीन वेळा आमदार असून विद्यमान उमेदवारदेखील आहेत. मुस्तफा हे नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मानले जातात. अगदी अलीकडे मुस्तफा यांनी ‘मै हिंदुओं को मारूँगा’ असे विधान केल्याचा आरोप आहे. मात्र, ‘मैं फितनों को मारूँगा’ असे विधान मी केले होते, हिंदूंबाबत बोललोच नव्हतो, असा मुस्तफा यांचा दावा आहे. माझा लढा माझ्या कौमसाठी आहे, माझ्यापेक्षा मोठा जलसा कोणी घेतला तर मी प्रशासनाला सांभाळता येणार नाही, अशी परिस्थिती मी निर्माण करीन असे ते म्हणाले होते.